
अडावद जिल्हा परिषद शाळेतील प्रवेशोत्सवाला आमदार चंद्रकांत सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती; शैक्षणिक नवचैतन्याचा उत्सव
अडावद जिल्हा परिषद शाळेतील प्रवेशोत्सवाला आमदार चंद्रकांत सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती; शैक्षणिक नवचैतन्याचा उत्सव
अडावद (प्रतिनिधी) –
नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांमध्ये उमेद आणि उत्साह निर्माण करण्याच्या उद्देशाने अडावद येथील जिल्हा परिषद शाळेचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला चक्क आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी स्वतः उपस्थित राहून सहभागी होत सर्वांचे लक्ष वेधले. त्यांच्या उपस्थितीमुळे शाळेच्या कार्यक्रमाला आगळंवेगळं महत्त्व लाभले.
प्रवेशोत्सवाची सुरुवात १६ जून रोजी सकाळी दहा वाजता झाली. यावेळी पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे फुलं, सेल्फी, लेझीम पथकाच्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. नवख्या विद्यार्थ्यांना चारचाकी वाहनांमधून शाळेत आणण्यात आले, तर त्यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन आमदारांनी स्वतः केले. विद्यार्थ्यांना दप्तर, पुस्तकं, शालेय साहित्य, बूट-सॉक्स व गणवेश वाटपही यावेळी करण्यात आले.
आमदारांचा भावनिक सल्ला आणि शालेय आठवणी
कार्यक्रमात आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी स्वतःच्या शाळेच्या पहिल्या दिवसाच्या आठवणी सांगत भावुक संवाद साधला. “माझेही शिक्षण जिल्हा परिषद शाळेतून झाले आहे,” असं सांगत त्यांनी ग्रामीण शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. मोबाईल-टीव्हीच्या आहारी जात असलेल्या पिढीला शिक्षणाच्या प्रवाहात टिकवण्यासाठी शिक्षकांनी अधिक सजग राहण्याची गरज व्यक्त केली.
सीबीएससी पॅटर्नचा शुभारंभ आणि सेल्फी पॉईंटचे अनावरण
यावर्षीपासून जिल्हा परिषद शाळांमध्ये सीबीएससी पॅटर्न लागू करण्यात आला असून, पहिलीच्या वर्गांपासून त्याचा शुभारंभ करण्यात आला आहे. याच अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या खास ‘सीबीएससी सेल्फी पॉईंट’चे अनावरण आमदार सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. एका विद्यार्थिनीच्या ओल्या पावलांच्या छापांनी प्रवेशाचा आनंद द्विगुणित झाला.
गटशिक्षणाधिकारींचे आवाहन : जिल्हा परिषदेच्या शाळेतच करा प्रवेश
कार्यक्रमात चोपडा पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांनी जिल्हा परिषद शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देत पालकांना आपल्या मुलांना सरकारी शाळांमध्येच प्रवेश द्यावा असे आवाहन केले. “सर्व शिक्षकांचे सीबीएससी पद्धतीचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यास सरपंच बबनखा तडवी, उपसरपंच विजिता पाटील, माजी सरपंच नामदेव पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नसरीन तडवी, ग्रामविकास अधिकारी प्रमोद सैंदाणे, विकासो संचालक लोकेश काबरा, पत्रकार जितेंद्र शिंपी, शिक्षणतज्ज्ञ आणि ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
शाळा, विद्यार्थी आणि पालकांच्या चेहऱ्यावर उमटले आनंदाचे रंग
प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने शाळेचे परिसर सणासारखे सजले होते. आमदारांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाल्यामुळे पालक वर्गही भारावून गेला होता. या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांचे नव्याने मूल्य अधोरेखित झाले असून, ग्रामीण शिक्षणाला नवे बळ मिळाल्याचे चित्र या सोहळ्यातून दिसून आले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम