
अमळनेरमध्ये लिफ्टच्या शॉकने कामगाराचा मृत्यू; ठेकेदार आणि अभियंत्यावर गुन्हा
अमळनेरमध्ये लिफ्टच्या शॉकने कामगाराचा मृत्यू; ठेकेदार आणि अभियंत्यावर गुन्हा
अमळनेर: चोपडा रस्त्यावर सुरू असलेल्या एका बांधकाम साईटवर लिफ्टच्या शॉकने एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १९ जुलै रोजी घडली. बंद लिफ्टला पर्यायी व्यवस्था न केल्याने हा अपघात घडल्याचा आरोप असून, याप्रकरणी ठेकेदार आणि अभियंत्याविरुद्ध मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा रस्त्यावरील ठाकुरदास चांदवाणी यांच्या वाणिज्य इमारतीचे बांधकाम सुरू आहे. येथे विनायक रतीराम नाईके (रा. सुदामापुरी सिंहाळा, खंडवा, मध्य प्रदेश) हा सेंट्रिंगचे काम करत होता. कामावरची पुली बंद पडल्यामुळे त्याचा मित्र राजाबाबू याने त्याला पाचव्या मजल्यावरून लोखंडी सळईला दोरी बांधून ती ओढायला सांगितली. विनायक सळई ओढत असताना अचानक लिफ्ट सुरू झाली. लोखंडी सळईचा लिफ्टच्या विद्युत प्रवाहाशी स्पर्श झाल्याने विनायकला जोरदार शॉक लागला.
त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेच्या अनेक दिवसांनंतर, २८ ऑगस्ट रोजी मृत विनायकचे वडील नानू यांनी अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यांनी ठेकेदार सुभाष त्रिभुवन आणि अभियंता निखिल नागदेव यांच्या निष्काळजीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. पोलिसांनी या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम