
अमळनेरात दोन गावठी पिस्तुलांसह दहशत माजविणारा जेरबंद
अमळनेरात दोन गावठी पिस्तुलांसह दहशत माजविणारा जेरबंद
अमळनेर (प्रतिनिधी) : शहरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने दोन गावठी पिस्तुल आणि चार जिवंत काडतुस बाळगणाऱ्या अनिल मोहन चंडाले (रा. गांधलीपुरा) याला एलसीबी व अमळनेर पोलिसांनी संयुक्त कारवाईत अटक केली. ही कारवाई २५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री ग्रामीण रुग्णालयाजवळ इंदिरा भुवन परिसरात करण्यात आली.
एलसीबीचे हेडकॉन्स्टेबल विष्णू बिऱ्हाडे, दीपक माळी, रवींद्र पाटील शहरात रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासत असताना पोलीस उपनिरीक्षक सोपान मोरे यांना शस्त्रसाठ्याची माहिती मिळाली. यावल येथील युवराज उर्फ युवा राजू भास्कर याच्याकडे पिस्तुल आणि काडतुसे आढळल्यावर त्याने कबुली दिली की भूषण कैलास सपकाळे (रा. भुसावळ) आणि समाधान बळीराम निकम (रा. पाचोरा) यांनी उमर्टी येथून तीन पिस्तुल व सहा काडतुसे आणली होती. त्यापैकी दोन पिस्तुल व चार काडतुसे अमळनेर येथील अनिल चंडाले याला विकण्यात आली होती.
याच माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी व स्थानिक पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. पोलीस निरीक्षक शरद काकळीज, संतोष नागरे, नितीन मनोरे यांच्यासह पथकाने सापळा रचून चंडाले याला बेड्या ठोकल्या. त्याच्याजवळून दोन गावठी पिस्तुल आणि चार काडतुसे असा एकूण ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम