बातमीदार | दि ४ जानेवारी २०२३
ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलमध्ये मुख्यमंत्री संदेश पत्रिकेचे वाचन आणि बालिका दिन साजरा
चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये मुख्यमंत्री संदेश पत्रिकेचे वाचन व वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी संदेश पत्रिकेचे सामुदायिक वाचन केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धात्मक अभियान, ‘वाचन महोत्सव’, ‘माझी शाळा, माझी परसबाग’, ‘स्वच्छता मॉनिटर टप्पा -२’, ‘दत्तक शाळा योजना’, ‘ शासन आपल्या दारी’ या नवनवीन उपक्रमांविषयी विद्यार्थ्यांना या पत्रिकेद्वारे माहिती मिळाली.
उच्च माध्यमिक शाळांमध्ये शासनातर्फे सॅनिटरी नॅपकिन पुरवणारी मशीन लावण्यात येणार आहेत. शाळांमध्ये डिजिटल लायब्ररी, इंग्लिश लैंग्वेज लॅब, रोबोटिक लॅब उभारून शिक्षणाच्या अद्ययावत संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात माहिती विद्यार्थ्यांना संदेश पत्रिकेद्वारे देण्यात आली.
आरोग्यदायी सुदृढ समाज घडवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांविषयी माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेतील मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, उप मुख्याध्यापक अमन पटेल, आणि समन्वयक दिप्ती पाटील, अश्विनी पाटील, सुचिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
शाळेतील शिक्षक जगदीश पाटील यांनी विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बालपणापासून ते आयुष्याच्या अंतिम टप्प्यापर्यंतच्या विविध प्रसंगांविषयी विस्तृत माहिती दिली.
सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्य समजावून सांगितले. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान आणि त्यांनी केलेले समाजकार्य यांची देखील सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
शाळेतील कलाशिक्षक देवेन बारी यांनी आकर्षक फलक रेखाटन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम