
“ऑपरेशन शोध” मोहिमेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील २३४ हरविलेल्या व्यक्तींचा यशस्वी शोध
“ऑपरेशन शोध” मोहिमेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील २३४ हरविलेल्या व्यक्तींचा यशस्वी शोध
जळगाव : हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी राज्यभरात राबविण्यात आलेल्या “ऑपरेशन शोध” या विशेष मोहिमेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील तब्बल २३४ व्यक्तींचा यशस्वी शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या निर्देशानुसार दिनांक १७ एप्रिल ते १५ मे २०२५ या कालावधीत “ऑपरेशन शोध” मोहिम राबविण्यात आली. यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाण्यांना विशेष पथक स्थापन करून मोहिम प्रभावीपणे राबविण्याचे आदेश दिले होते.
या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या मिसिंग व्यक्तींच्या प्रकरणांचा तपास करताना, विशेष पथकांनी १४७ महिला व ८७ पुरुष अशा एकूण २३४ हरविलेल्या व्यक्तींना शोधून काढले. त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही मोहिम भविष्यातही प्रभावीपणे राबविण्यात येणार असून, अधिकाधिक हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सर्व उपविभागीय अधिकारी व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जळगाव पोलिसांच्या या तत्परतेबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात असून, हरविलेल्या कुटुंबीयांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम