केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्याकडून कृषी फीडर प्रकल्पाचा आढावा : कामांना गती देण्याचे दिले निर्देश

बातमी शेअर करा...

केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्याकडून कृषी फीडर प्रकल्पाचा आढावा : कामांना गती देण्याचे दिले निर्देश

जळगाव प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या पुनर्रचना वितरण क्षेत्र योजना (RDSS) अंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या कृषी फीडर विभक्तीकरण प्रकल्प प्रगतीचा आढावा आज केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला.

या बैठकीस जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महावितरणचे मुख्य अभियंता विनोद पाटील, पायाभूत आराखडा विभागाचे मुख्य अभियंता मनोज विश्वासे, सावदा विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश महाजन तसेच विविध जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

या वेळी प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा, कामांची टक्केवारी, अंमलबजावणीत येणाऱ्या अडथळ्यांबाबत तसेच तालुकानिहाय कामांच्या नियोजनावर सविस्तर चर्चा झाली.

*प्रगतीस गती द्या, अडथळ्यांवर तात्काळ उपाय करा*
राज्यमंत्री खडसे यांनी स्पष्ट शब्दांत निर्देश दिले की, चालू कामांना अधिक गती द्यावी,
अंमलबजावणीतील अडथळ्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात,स्थानिक प्रशासन, महावितरण व जनप्रतिनिधी यांच्यात समन्वय वाढवावा,आणि निश्चित वेळेत प्रकल्प पूर्ण करून शेतकऱ्यांना अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करावा. त्यांनी नमूद केले की, या योजनेमुळे शेतीसाठी वेळेवर आणि योग्य दाबाने वीज मिळाल्याने उत्पादनात वाढ होईल आणि शेती फायदेशीर ठरेल.
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पूर्ण सहकार्य दिले जाईल, असे आश्वासन दिले.
बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी प्रगती अहवाल सादर करत उर्वरित कामांसाठी कालबद्ध आराखडा मांडला. प्रत्येक तालुक्यातील अडथळ्यांवर उपाययोजना निश्चित करण्यात आल्या.
या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना निश्चित वेळेत आणि अखंड वीजपुरवठा शक्य होणार असून शेतीला चालना मिळेल, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम