
खरीप २०२४ पीक विमा नुकसानभरपाई आणि बोदवडच्या केळी उत्पादकांना न्याय मिळावा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी
खरीप २०२४ पीक विमा नुकसानभरपाई आणि बोदवडच्या केळी उत्पादकांना न्याय मिळावा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी
जळगाव : खरीप हंगाम २०२४ मध्ये जळगाव जिल्ह्यासह मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील कापूस, मका, सोयाबीन यासह विविध पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची तक्रार शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे केली असून विमा प्रतिनिधींकडून क्षेत्र पाहणीही पूर्ण करण्यात आली आहे. मात्र, अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाई जमा झालेली नाही. तसेच बोदवड तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी हवामान आधारित फळ पीक विमा योजनेतून वगळले गेले असून यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, अशोक लाड वंजारी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, खरीप २०२४ मध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. तसेच, बोदवड तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचा हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत समावेश करून त्यांना योग्य ते लाभ मिळावा. ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांनी देखील ऑक्टोबर २०२४ मध्ये मुख्य सचिवांना पत्राद्वारे याबाबत विशेष विनंती केली होती.
केळी ही आता बारमाही लागवड असल्यामुळे विमा योजनेच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर तालुका कृषी कार्यालयाने सुधारित अहवाल तयार करून १ ऑक्टोबर २०२४ रोजी शासन दरबारी पाठवला आहे. या अहवालात बोदवड तालुक्यातील केळी लागवडीचा विमा योजनेसाठी समावेश करण्याची शिफारस केली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम