
गोळीबार प्रकरणात दोन संशयितांना अटक
मुख्य संशयित फरार
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहरातील सेंट जोसेफ शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गुरुवारी (दि. २४ एप्रिल) रात्री ९ ते ९:३० वाजेच्या सुमारास वाढदिवसाच्या उत्सवात गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. पूर्ववैमनस्यातून महेंद्र समाधान सपकाळे (वय २०, रा. प्रबुद्ध नगर, पिंप्राळा) याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात महेंद्रच्या कमरेखाली गोळी लागल्याने त्याला तातडीने जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे, तर मुख्य संशयित अद्याप फरार आहे.
महेंद्र सपकाळे आपला मित्र भूषण मनोज अहिरे याच्या वाढदिवसानिमित्त मित्र अक्षय नारायण राठोड (उर्फ गण्या) आणि सचिन चौधरी यांच्यासह सेंट जोसेफ शाळेच्या प्रवेशद्वारासमोर केक कापण्यासाठी गेला होता. यावेळी विशाल भिकन कोळी, बापू वंशीलाल धोबी (दोघेही रा. पिंप्राळा), वैभव धीरज कोळी (रा. धरणगाव) आणि भोला भोई (रा. पिंप्राळा) हे चार ते पाच साथीदारांसह तिथे आले. त्यांनी महेंद्रला शिवीगाळ करत वाद घातला.”जिवंत सोडणार नाही”
विशाल कोळीने महेंद्रला धमकी देत म्हटले, “रामनवमीच्या दिवशी तू माझ्या वडिलांना मारले आहेस, मी तुला जिवंत सोडणार नाही.” यानंतर विशालने कमरेला लपवलेली बंदूक काढून महेंद्रच्या उजव्या बाजूच्या कमरेवर गोळी झाडली. याचवेळी बापू धोबी, वैभव कोळी आणि भोला भोई यांनी महेंद्रला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महेंद्रला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले..
महेंद्र सपकाळे याच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात विशाल भिकन कोळी, बापू वंशीलाल धोबी, वैभव धीरज कोळी आणि भोला भोई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास सुरू करत दोन संशयितांना अटक केली आहे, तर मुख्य संशयित विशाल कोळी आणि त्याचा एक साथीदार अद्याप फरार आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरूडे करीत आहेत.परिसरात खळबळ
या गोळीबाराच्या घटनेने जळगाव शहरात खळबळ उडाली आहे. पूर्ववैमनस्यातून घडलेल्या या हिंसक घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी फरार संशयितांचा शोध तीव्र केला असून, लवकरच त्यांना ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम