
जम्मू – काश्मीर येथील पहलगाम येथे निर्दोष नागरिकांवर झालेल्या हत्याकांडाचा तीव्र निषेध – अभाविप
रावेर
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे धर्म विचारून निर्दोष नागरिकांची गोळ्या घालून हत्या केल्याच्या निषेधार्थ येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निषेध केला असून दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
दि. २३ एप्रिल २०२५ रोजी जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे धर्म विचारून निर्दोष नागरिकांची गोळ्या घालून हत्या केल्याची अत्यंत दुःखद आणि घृणास्पद घटना घडली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध करते. या घटनेमुळे देशातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे. केवळ धर्म विचारून निष्पाप लोकांचे प्राण घेणे हे दहशतवादाचे आणि कट्टरवादाचे अत्यंत निंदनीय स्वरूप आहे. अभाविप या हिंसाचाराचा आणि द्वेषपूर्ण कृत्यांचा कठोर शब्दांत निषेध करते.
त्यानुसार दि. २३ रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या रावेर शाखेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे या घटनेच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी अभाविप रावेर शहर उपाध्यक्ष प्रा. शिरीष पाटील, प्रदेश संयोजक सोशल मिडिया, जिल्हा सहसंयोजक अभिषेक महाजन, शहर सहमंत्री हेमंत पाटील, कार्यक्रम प्रमुख लोकेश बारी, महाविद्यालय अध्यक्ष युवराज रायपूरकर, साई चौधरी, हेमंत कोष्टी, रोहन चौधरी, ललित बारी, रमण चौधरी व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी हातात निषेधाचे फलक घेऊन घोषणाबाजी करत या दहशतवादी कृत्याबद्दल त्यांचा पुतळा दहन केला.
अभाविपची मागणी आहे की, या हत्याकांडातील दोषींना त्वरित अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी. जम्मू आणि काश्मीरमधील निर्दोष नागरिकांच्या सुरक्षेची आणि संरक्षणाची व्यवस्था अधिक मजबूत करावी, केंद्र सरकारने या घटनेचा गांभीर्याने दखल घेऊन प्रभावी उपाययोजना करावी जेणेकरून भविष्यात अशा घटनांना पायबंद घालता येईल व समाजात द्वेष आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कट्टरपंथी विचारांचा समूळ नायनाट करण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याची गरज आहे. अभाविप नेहमीच देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लढत आलेली आहे. अभाविप या दुःखद प्रसंगी मृत झालेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते तसेच या पीडित कुटुंबांच्या दुःखात सहभागी आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम