
जळगावमध्ये सून्नी ईदगाहवर नमाजे ईद-उल-अझहा अदा
जळगावमध्ये सून्नी ईदगाहवर नमाजे ईद-उल-अझहा अदा
जळगाव, दि. ७ जून २०२५ (प्रतिनिधी):
दरवर्षीप्रमाणे यंदाही जळगाव शहरातील मुस्लिम बांधवांनी ईद-उल-अझहा (बकरी ईद) हा पवित्र सण अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात साजरा केला. शहरातील नियाज अली नगर, सुप्रीम कॉलनी येथील सून्नी ईदगाह मैदानावर सकाळी ८.३० वाजता विशेष नमाजे ईद-उल-अझहा मौलाना जाबीर रझा यांच्या नेतृत्वाखाली शांततामय वातावरणात अदा करण्यात आली.
या प्रसंगी सुमारे ८,००० नमाजी बांधवांची उपस्थिती लाभली होती. नमाजपूर्वी मौलाना नजमूल हक यांनी नमाज पठणाची पद्धत (तरिका-ए-नमाज) समजावून सांगितली. त्यानंतर मौलाना अलीम रझा यांनी ईदचे महत्त्व विशद करणारे प्रभावी प्रवचन (बयान) दिले.
या वेळी “ए अल्लाह, हमारी और हमारे मुल्क भारत की हिफाजत फरमा, बेरोजगारों को रोजगार अता फरमा, बिमारों को शिफा अता कर” अशी सामूहिक प्रार्थना (दुआ) करण्यात आली, ज्याला उपस्थितांनी “आमीन” म्हणत प्रतिसाद दिला.
कार्यक्रमानंतर सून्नी ईदगाह ट्रस्ट व सून्नी जामा मस्जिद जळगावचे अध्यक्ष सैयद अयाज अली नियाज अली यांनी नमाज व ईद साजरी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या जळगाव जिल्हा पोलीस दल, एमआयडीसी पोलीस स्टेशन, तसेच जळगाव महानगरपालिकेचे आभार मानले. त्यांनी सर्वांना शांतता राखण्याचे, शासनाच्या परवानगीतील प्राण्यांचीच कुर्बानी करण्याचे व स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची सांगता सलातो सलामने करण्यात आली. यावेळी सैयद अयाज अली नियाज अली, मौलाना खलील बरकाती, इकबाल वझीर, मौलाना अलीम रझा, अफझल मनियार, मुख्तार शाह, साबीर मुत्सुफाबादी, उमर खान, रहेमत अली, जमील शेख यांच्यासह अनेक मान्यवर आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम