
जळगाव जिल्ह्यात वावडे, लासगाव व वेल्हाळे उपकेंद्राना १७ मेगावॅट सौर ऊर्जेची जोड
आठ गावातील हजारो शेतकऱ्यांना होतोय दिवसा वीज पुरवठा
जळगाव जिल्ह्यात वावडे, लासगाव व वेल्हाळे उपकेंद्राना १७ मेगावॅट सौर ऊर्जेची जोड
आठ गावातील हजारो शेतकऱ्यांना होतोय दिवसा वीज पुरवठा
जळगाव प्रतिनिधी
सौरऊर्जा निर्मिती, मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी आणि शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा हा शासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. त्याअंतर्गत महावितरणच्या जळगाव मंडलात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी कार्यक्रमाला वेग देण्यात आला असून वावडे (ता. अमळनेर), लासगाव (ता. पाचोरा) व वेल्हाळे (ता. भुसावळ) या 33/11 केव्ही उपकेंद्रांना 17 मेगावॅट सौरऊर्जेची जोड देण्यात आल्याने सद्यस्थितीत सुमारे साडेतीन हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणे शक्य झाले आहे.
जळगाव जिल्ह्यात महावितरणतर्फ़े मेघा इंजिनिअरींग ॲन्ड इन्फ़्रास्ट्रक्चर लिमिटेड या एजन्सी मार्फ़त मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी प्रकल्पाचे काम सुरु आहे. नुकतेच अमळनेर तालुक्यात वावडे, येथील 33/11 केव्ही वीज उपकेंद्रांतर्गत 4 मेगावॅट सौर ऊर्जा निर्माण करुन ती वावडे उपकेंद्रास जोडण्यात आली आहे. सदर उपकेंद्रातून 2350 कृषीपंपाना दिवसा वीज पुरवठ्याची सोय झाली असल्याची माहीती उपकार्यकारी अभियंता तुषार नेमाडे यांनी दिली. पुरेशा क्षमतेचा पॉवर ट्रान्सफ़ॉर्मर बसविल्यानंतर एकूण बारा गावातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.
पाचोरा तालुक्यात लासगाव 33/11 केव्ही उपकेंद्रासही या योजनेतंर्गत पाच मेगावॅट सौरऊर्जेची जोड देण्यात आली असून सध्या केवळ लासगाव व सामनेर या दोन गावातील 650 शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्याची सोय महावितरणने उपलब्ध करुन दिली असल्याची माहीती कार्यकारी अभियंता सखाराम थन्वी यांनी दिली.
जळगावच्या भुसावळ तालुक्यातही वेल्हाळे 33/11 केव्ही वीज उपकेंद्रास मुख्यमंत्री सौरकृषी वाहीनी योजनेतून आठ मेगावॅट सौरऊर्जेची रसद मिळाली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत व्हेल्हाळे, किनी आणि साखरा या गावातील 60 वीजवितरण रोहित्राव्दारे 360 शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याची सोय झाली आहे. परिमंडलात मुख्य अभियंता श्री आय.ए.मुलाणी व अधीक्षक अभियंता श्री अनिल महाजन व पायाभूत सुविधा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री मनोज विश्वासे यांच्या प्रयत्नातून इतर प्रकल्पांचेही काम प्रगतीपथावर आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम