तंत्रज्ञानाला परिश्रमाची जोड द्या – अशोक जैन

बातमी शेअर करा...

तंत्रज्ञानाला परिश्रमाची जोड द्या – अशोक जैन

इनोव्हेशनमध्ये अहमदाबाद, बिझनेस प्लॅन स्पर्धेत पुणे जिल्हा प्रथम; ‘फाली-२०२५’ च्या दुसऱ्या सत्राचा समारोप

जळगाव  (प्रतिनिधी) – ‘आताची पिढी माहिती व तंत्रज्ञानाच्या दृष्टीने खूप प्रगत आहे त्यांना कमी वेळेत कमी श्रमात यश मिळेल यासाठी आशा असते, त्यादृष्टीने ते प्रयत्न करतात. मात्र तंत्रज्ञानासोबतच कठोर परिश्रम करावेच लागेल. ‘कर्म हेच जीवन’ मानून नैतिकता, पारदर्शकता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुणवत्तेत कुठेही तडजोड केली नाही तर शेतीसह कुठल्याही व्यवसायात यशस्वी होता येते; असा प्रेरणादायी संवाद जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले.

जैन हिल्स येथे ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) च्या अकराव्या अधिवेशनच्या दुसऱ्या सत्राचा आज समारोप झाला. इनोव्हेशन व अॅग्रीटेक बिझनेस प्लॅन स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. त्यावेळी अशोक जैन यांनी प्रश्नोत्तरांद्वारे फालीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

याप्रसंगी व्यासपीठावर इनोव्हेशन व बिझनेस मॉडेल स्पर्धेतील परिक्षकांसह फालीच्या संचालिका नॅन्सी बॅरी, जैन फार्मफ्रेश फूडसचे संचालक अथांग जैन, वरिष्ठ आंतरराष्ट्रीय केळीतज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील, डॉ. बी. के यादव, सचिन शर्मा-आयटीसी, डॉ. समीर मुडली-गोदरेज जर्सी, राजश्री सावंत, भार्गवी सकपाल-स्टार अॅग्रीबाजार, मिकेशकुमार राठोड, रितेश सुतारीया-प्रोम्पट, अंजिक्य तांदळे-युपीएल, पंकज पाटील- युपीएल, निखील सोंडे, गोपी एन.-गोदरेज जर्सी, कपिल रेन्व्हा, संचेत जैन-स्टार अॅग्री, संजीव भिस्त, आयुषी शर्मा-ओमनीवोर यांच्यासह कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दोघंही स्पर्धेतील विजेत्यांना चषक, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. सोबतच माजी फाली विद्यार्थी व शिक्षकांसह सहकार्य करणाऱ्या कंपनी प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. समूह चर्चेतून विघ्नेश देशमूख, राधिका थोरात, लोरीया पटेल, या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.  माजी विद्यार्थी सानिया सर्व्हे यांनी मनोगत व्यक्त केले. या कंपनी प्रतिनिधींनीसुद्धा संवाद साधला.

कंपनीची सुरवात, व्यवसायातील कठिण परिस्थीतीचा सामना, शेतीच हा व्यवसाय का निवडला, संपूर्ण व्यवस्थापन करताना कुठून ऊर्जा मिळते, अशा स्वरूपातील प्रश्नांच्या उत्तर देताना समर्पक उदाहरणांचे दाखले अशोक जैन यांनी संवाद साधताना दिले. त्यात ते म्हणाले की, शेत, शेतकरी आणि जैन इरिगेशन हे अतूट नातं जुडलं आहे. सहकार्य भावनेतून परस्परातील विश्वास, पारदर्शकता, परिश्रम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुणवत्ता यातूनच शेतकऱ्यांची कंपनी म्हणून कार्यरत आहे.

वडील श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी डेप्यूटी कलेक्टर म्हणून नेमणूक झाल्यानंतर आई गौराई यांना ही आनंदाची बातमी सांगितली. त्यावर आई म्हणाल्या, ‘नोकरी करून पाच पंचवीस लोकांचं पोट भरेल परंतू तू असं काहि तरी करं की ज्याने मुक पशू-पक्षी, किडा-मुंग्या यांसह निसर्गाची सेवा होईल’  असा कानमंत्र दिला. या मातृप्रेरणेतून ‘सार्थक करूया जन्माचे रूप पालटू वसुंधरेचे’ या जीवनलक्ष्यासह कार्य करून शेतकऱ्यांचा जीवनात परिवर्तन घडविले. हाच वारसा घेऊन आम्ही व आमची पुढची पिढीसुद्धा शेत, शेतकऱ्यांसाठी बांधिल आहे.

 शेतकऱ्यांना महत्त्व दिल्यानेच कंपनीचा विकास झाला. कठिण काळातही शेतकरी, भागभांडवलदारांसह, सहकारी सोबत राहिले आणि कठोर परिश्रमातून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा कंपनीने यशस्वी भरारी घेतली. विशिष्ट ध्येय ठेऊन आपल्या कामाला प्राधान्य दिले पाहिजे, त्यानंतर परिवार, समाज यांचा क्रम लागतो. ‘कर्म हेच जीवन’ मानून आपले कार्य सुरूच ठेवले पाहिजे. ‘कल्पना कणापरी ब्रम्हांडाचा भेद करी’ हे ब्रीद वाक्य डोळ्यांसमोर ठेऊन लहानातील लहान गोष्टींचा विचार करून ध्येयपूर्वक नियोजन ठेवले तर आपण मोठ्या उंचीवर पोहचू शकतो. यशस्वी झाल्यानंतर आपले पाय जमिनीवरच असले पाहिजे, त्यासाठी कंपनीचे मुख्यालय हे जळगाव आहे येथूनच जगभरातील १४० देशांमध्ये शेती उपयुक्त उत्पादने कंपनी पोहचवित असल्याचेही त्यांनी सांगितले.

 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देताना सांगितले की, जैन हिल्सवर आल्यानंतर टिश्यूकल्चर, फ्युचर फार्मिंगसह अन्य तंत्रज्ञान पाहून हे आपला देशही शक्तीशाली होऊ शकतो असा विश्वास निर्माण झाला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या लाटेत जीवनात बदल घडविणारे उत्तम खलाशी होण्याची प्रेरणा याठिकाणाहून मिळाल्याचेही विद्यार्थी म्हणाले. नॅन्सी बॅरी यांनी आभार मानले. हर्ष नौटियाल, रोहिणी घाडगे यांनी सूत्रसंचालन केले.

फालीच्या विद्यार्थ्यांनी साजरा केला महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र दिन व कामगार दिन असल्याने फालीच्या विद्यार्थ्यांनी गांधी रिसर्च फाऊंडेशन परिसरात ध्वजारोहण करून साजरा केला. डॉ. के. बी.पाटील व फालीच्या संचालिका नॅन्सी बॅरी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी डॉ. के. बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून महाराष्ट्राच्या प्रगतीत शेतीचे योगदान अधोरेखित केले. त्यासाठी भवरलाल जैन यांच्यासह शेतीपूरक संशोधनाला प्रोत्साहन देणाऱ्यांमुळेच शेतीकरी तंत्रज्ञान आत्मसात करून आपली प्रगती साधत असल्याचे ते म्हणाले.

इनोव्हेशन स्पर्धेतील विजेते

फाली अकरावे अधिविशेनच्या पहिल्या सत्रात जैन हिल्सच्या आकाश ग्राऊंडवर अॅग्रीटेक इनोव्हेशन स्पर्धा घेण्यात आली. त्यात संपूर्ण महाराष्ट्रातून ४७ इनोव्हेशन फालीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यात ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्याचा प्रयत्न होता. वाया जाणारे ऑईलपासून इंधन म्हणून स्टो चा वापर, एकात्मिक शेती पद्धती यासह अनेक संशोधक उपकरणांचे सादरीकरण करण्यात आले. एकाच वेळेला ३०० किलो धान्यावर प्रक्रिया करणारे अॅग्टेक युव्हीसी सरफेस डिसइनफेक्शन हे मॉडेल आनंद निकेतन सरखेज कॅम्पस (क्रेंब्रीज बोर्ड) अहमदाबाद यांचा प्रथम क्रमांक आला. तर रावजी फाटे विद्यालय खराशी जि. भंडारा (राईस कल्टिवेशन-यिल्ड पर ड्रॉप मॉडेल) द्वितीय, महात्मा फुले विद्यालय अॅण्ड ज्युनिअर कॉलेज महागाव, जि. कोल्हापूर (ऑटोमेटिक ट्रॅक्टर) तृतीय, जीवन विकास विद्यालय, दुसरबिड जि. बुलढाणा (एआय वर आधारीत इंटिर्गेटेड पेस्ट मॅनेजमेंट) चतुर्थ, ज्ञानेश्वर विद्यालय सालेभाटा, जि. भंडारा (सन सेन्स इरिगेशन स्मार्ट फार्मिंग व स्मार्ट वॉटरिंग) पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

बिझनेशन प्लॅन सादरीकरणातील विजेते

जैन हिल्सच्या परिश्रम हॉल, बडी हांडा हॉल, गांधी तिर्थच्या कस्तूरबा हॉलसह क्लासरूमध्ये एकाच वेळी फालीच्या विद्यार्थ्यांनी बिझनेशन प्लॅन चे सादरीकरण केले. स्थानिक मातीतून उपलब्ध होणाऱ्या संसाधनांमध्ये कमीतकमी भांडवल वापरून रोजगार निर्मितीसह शेतीपूरक उद्योग उभारणीसाठी ४८ उत्तम व्यवसायीक मॉडेल फालीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले.  यात प्रथम क्रमांकाने शारदाबाई पवार विद्यालय शिवनगर जि. पुणे(बांबू ब्लिस लेडी केअर) तर महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय देवगावमाली जि. बुलढाणा (व्हेजिटेबल डिहायटेशन) द्वितीय,  आनंद निकेतन सरखेज कॅम्पस (क्रेंब्रीज बोर्ड) अहमदाबाद (अॅग्रीकूल सॅक) तृतीय, आनंद निकेतन सरखेज कॅम्पस (क्रेंब्रीज बोर्ड) अहमदाबाद (इको स्प्राऊड शिट्स), न्यू इंग्लिश स्कूल भालोद जळगाव यांचे कार्बन न्यूट्ल फार्मिंगला पाचवा क्रमांक मिळाला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम