
तळेगाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ – पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
तळेगाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ – पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
गेल्या काही महिन्यांत वाढत्या चोऱ्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज
तळेगाव (ता. जामनेर) – तळेगाव व परिसरातील गावांमध्ये चोरट्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, गेल्या काही महिन्यांत घरफोड्या, दुचाकी चोरी, वीजपंप व जनावरे चोरीच्या घटनांनी परिसर हादरून गेला आहे. पोलीस कारवाईत पूर्णपणे दिरंगाई होत असल्याने ग्रामस्थांत अस्वस्थता आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.
दिनांक ३० जुलै रोजी तळेगाव येथे एका रात्रीत तीन घरे फोडून चोरट्यांनी सोनं, चांदी व रोख रक्कम असा सुमारे दोन लाखांचा ऐवज लंपास केला. गजानन देवचंद जाधव (दैनिक सकाळ पत्रकार), मीराबाई सुरेश पालवे व कौसाबाई रामलाल भडांगे यांच्या घरांवर ही चोरी झाली.
चोरीचा तपशील असा:
-
मीराबाई पालवे यांच्या घरातून १४ ग्रॅम सोने, सौर पंपासाठीची ₹१.६० लाख रोख
-
गजानन जाधव यांच्या घरातून १२ ग्रॅम सोन्याची पोत व ₹५००
-
रामलाल भडांगे यांच्या घरातून ₹६०,००० रोख व ५०० ग्रॅम चांदी
तसेच, चोरट्यांनी दोन दुचाकी चोरण्याचा प्रयत्न केला. त्यातील एक गाडी घटनास्थळीच सोडून देण्यात आली, तर दुसरी गाडी शहापूर शिवारातील मक्याच्या शेतात सापडली. त्या ठिकाणी मद्यपानाचे पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे चोरीपूर्वी चोरटे मद्यधुंद अवस्थेत होते, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
तक्रारी दाखल असूनही पोलीस तपासात प्रगती नाही, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, वारंवार अर्ज देऊनही कारवाई न झाल्याने चोरांचे मनोबल अधिकच वाढले आहे.
गेल्या काही महिन्यांतील इतर चोऱ्या:
-
४८ वीज मोटारी व सौर पंप चोरी
-
दोन बैल जोड्या व जनावरे
-
गोडाऊनमधून कापूस चोरी
-
शेतातील अवजारे व किरकोळ चोऱ्या
या सर्व घटनांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. परिणामी पोलीस प्रशासनावर ग्रामस्थांचा रोष वाढत असून, काही नागरिक थेट पोलिसांवरच संशय व्यक्त करत आहेत.
गावकऱ्यांची जोरदार मागणी:
तळेगाव व परिसरातील वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा यांनी तात्काळ लक्ष घालून तपासाला गती द्यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम