
पिंप्री प्र.अ. येथील सरपंच रूपाली पगारे अपात्र
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आदेश
पारोळा प्रतिनिधी
शासकीय जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण केल्याच्या आरोपांतर्गत पिंप्री प्र.अ. ग्रामपंचायतीच्या सरपंच कु. रुपाली भिकन पगारे यांना पदावरून अपात्र ठरवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14(ज-3) अन्वये दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी हा निर्णय दिला.
ही कारवाई ग्रामपंचायत सदस्य गुलाब जगन्नाथ पाटील यांच्या तक्रारीवरून करण्यात आली. त्यांनी दाखल केलेल्या अर्ज क्र. 99/2025 मध्ये आरोप करण्यात आला होता की, सरपंच रुपाली पगारे यांच्या वडील, कुटुंबीय व एकत्र कुटुंबातील सदस्यांनी गावातील स.नं. 85 ब, 85 क व गट नं. 137, 138 या शासकीय जमिनींवर बेकायदेशीर बांधकाम करून अतिक्रमण केले आहे.
या तक्रारीसंदर्भात झालेल्या सुनावणीत समोर आले की, संबंधितांनी अतिक्रमण न दर्शविणारे शासकीय दस्तऐवज, मोजणी अहवाल, वैध चित्रफीत किंवा जिओ-टॅग फोटो आदी तांत्रिक स्वरूपाचे कोणतेही ठोस पुरावे सादर केले नाहीत. गटविकास अधिकारी, पारोळा यांच्याकडून प्राप्त अहवालात व पंचनाम्यातही अतिक्रमण झाल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते.
विशेष म्हणजे सरपंच पगारे यांचे वडील भिकन बारकू पगारे यांच्यासोबत अतिक्रमित जागेवरील मिळकतीत वास्तव्यास असल्याचेही नोंद करण्यात आले. त्यामुळे त्यांचे कृत्य महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 14(ज-3) अंतर्गत त्यांना अपात्र ठरवण्यासाठी पर्याप्त ठरले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम