बोर घाटातील भीषण अपघातात बाप-लेकाचा मृत्यू

बातमी शेअर करा...

बोर घाटातील भीषण अपघातात बाप-लेकाचा मृत्यू;

रावेर तालुक्यात हळहळ

रावेर : रावेर तालुक्यातील बोर घाटात सोमवारी रात्री घडलेल्या हृदयद्रावक अपघातात एकाच कुटुंबातील बाप-लेकाचा मृत्यू झाला. थार जीप आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण धडकेत पिंटू बोडोले (वय ३०) आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा रितीक बोडोले यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. या दुर्घटनेने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंटू बोडोले हे पत्नी मालुबाई (वय २८) व दोन लहान मुलांसह भुसावळहून पाल गावाकडे नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाले होते. रात्रीच्या सुमारास बोर घाटात खेरगावकडून भरधाव वेगात येणाऱ्या थार जीपने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका जबरदस्त होता की, पिंटू आणि रितीक यांचा जागीच मृत्यू झाला, तर मालुबाई आणि आठ महिन्यांचा चिमुकला टेंगुराम गंभीर जखमी झाले आहेत.

बोडोले कुटुंब भुसावळमध्ये मजुरी करून आपला चरितार्थ चालवत होते. आधीच हालाखीच्या परिस्थितीत जगत असलेल्या या आदिवासी कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अपघाताची माहिती मिळताच भाजपा रावेर पूर्व तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील व बाळा आमोदकर यांनी रावेर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. जखमींना तातडीने प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी फैजपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांनी शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वनही केले.

दरम्यान, पोलिसांनी अपघातानंतर संबंधित थार जीप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम