
भुसावळ रेल्वे स्थानकावर दोन मोबाईल चोरांना आरपीएफकडून अटक
भुसावळ रेल्वे स्थानकावर दोन मोबाईल चोरांना आरपीएफकडून अटक
भुसावळ प्रतिनिधी : भुसावळ रेल्वेमार्गावर धावणाऱ्या गाड्यांमध्ये अलीकडेच अवैध फेरीवाले आणि चोरट्यांचा त्रास वाढला आहे. प्रवाशांचे मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू चोरीस जाण्याच्या घटनांमध्ये सातत्य दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलीस दल (आरपीएफ) आणि जीआरपीकडून विशेष गस्तीद्वारे कारवाया सुरू असून, नुकत्याच झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मोबाईल चोरीप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
पहिल्या घटनेत, प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर आरपीएफचे जवान जे. बी. नेरपगार, महेंद्र कुशवाह, कपिल सांगवान, अनुज कुमार आणि बाबू मिर्झा हे गस्त घालत असताना एक तरुण संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव नितीन संजय धनके (वय २६, रा. मुक्ताईनगर) असे सांगितले. त्याच्या खिशात झांसी एक्स्प्रेस (०१९२१) या गाडीच्या स्लीपर कोचमधून चोरलेला अंदाजे २० हजार रुपये किमतीचा मोबाईल आढळून आला. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली आहे.
दुसऱ्या घटनेत, शुक्रवारी धनबाद एक्स्प्रेसच्या स्लीपर कोचमध्ये प्रदीप विलास ठोमरे (वय २५) हा व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना दिसून आला. त्याला ताब्यात घेतल्यावर, त्याने चोरीच्या उद्देशाने स्थानकावर आल्याचे मान्य केले. त्याच्याविरुद्ध लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही कारवाया आरपीएफ निरीक्षक पी. आर. मीणा आणि लोहमार्ग पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम