
महिला व तरुणींनी स्वताचे संरक्षण करण्यासाठी तयार राहावे -प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे
‘सायबर सिक्युरीटी व मुलींचे संरक्षण’ विषयावर कार्यशाळा
महिला व तरुणींनी स्वताचे संरक्षण करण्यासाठी तयार राहावे -प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे
‘सायबर सिक्युरीटी व मुलींचे संरक्षण’ विषयावर कार्यशाळा
जळगाव I प्रतिनिधी
सध्या समाजात महिला व विद्यार्थिनींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात येत असून महिला व विद्यार्थिनींनी स्वत:चे रक्षण करण्यासाठी इतरांच्या मदतीची वाट न पाहता स्वत: तयार असावे असे आवाहन प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार सेवा विभागातर्फे केंद्रिय विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ‘सायबर सिक्युरीटी व मुलींचे संरक्षण’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी मंचावर जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या सहा. पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे, सायबर सेलच्या पोलीस हेड कॉन्स्टेबल स्वाती पाटील, केंद्रिय विद्यालयाचे प्राचार्य सोना कुमार व आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा. आशुतोष पाटील हे उपस्थित होते. प्रा. इंगळे यांनी सांगितले की, महिला व विद्यार्थिनी यांच्यावरील लैगिंक शोषण थांबले पाहिजे समाजाने महिलांना सन्मानाने वागणूक देणे गरजेचे आहे.
सहा. पोलिस निरीक्षक माधुरी बोरसे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, दररोजच्या वाचनात आपणास महिला व कमी वयातील मुलींवरील अत्याचाराच्या घटना निदर्शनास येतात. महिलांनी व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्याजवळ स्व-संरक्षणासाठी मिरचीच्या पाण्याची पुडी किंवा बारीक मिरचीची पुड व सहज हातात येईल असे छोटे टोकदार हत्यार बाळगले पाहिजे. कराटे शिकले पाहिजे जेणेकरून आपली सुरक्षितता करता येईल.
त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपयोगी असणाऱ्या विविध ॲप व आपत्कालीन दूरध्वनी क्रमांकांची माहिती दिली. सायबर सेलच्या पोलीस हेड कॉन्स्टेबल स्वाती तायडे यांनी सायबर सिक्युरीटी या विषयावर माहिती देतांना विविध आमिष, फ्रॉड कॉल, व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांची माहिती देत सुरक्षिततेविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी शिक्षिका प्रीती सोज्वल व विद्या भालेराव व मिनाक्षी पाटील यांनी सायबर फसवणुकीचे प्रसंग कथन केले. प्रास्ताविक प्रा. आशुतोष पाटील यांनी केले. प्राचार्य सोना कुमार यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुभाष पवार यांनी तर आभार विद्यार्थी तेजल पाटील व उज्वल पाटील यांनी मानले. या प्रसंगी केंद्रिय विद्यालयातील ३०० विद्यार्थी व शिक्षक, शिक्षकेत्तर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम