
मायमराठीच्या नामघोषाने दुमदुमले शहर
मराठी भाषा गौरव दिन’ मोठ्या उत्साहात साजरा
जळगाव प्रतिनिधी
अभिजात मराठी…अभिमान मराठी…, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या घोषणांनी काव्यरत्नावली परिसर मराठीमय झाला. निमित्त होते, मराठी भाषा गौरव दिनाचे. मूळजी जेठा महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने ‘मराठी भाषा गौरव दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी काव्यरत्नावली चौकातून ग्रंथ दिंडी व शोभायात्रेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. साहित्यिक माया धुप्पड यांनी पालखीचे पूजन केले. शोभायात्रेत पारंपारिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यात विठ्ठलाची वेशभूषा कल्पेश पवार या विद्यार्थ्याने व रुक्मिणीची वेशभूषा प्राजक्ता राजपूत या विद्यार्थिनीने केली होती. यात तानाजी मालुसरे,विविध संत,वारकरी, आदिवासी,कवी कवयित्री यांच्या वेशभूषेत विद्यार्थी आले होते. लेझीम पथक, झांज पथक यांचा शोभायात्रेत समावेश होता. यामध्ये गुरुवर्य प. वि.पाटील शाळेच्या विद्यार्थ्यांचे लेझिम आणि झांज पथक, तसेच मूळजी जेठा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचे लेझिम पथकाने बहारदार सादरीकरणाने उपस्थितांकंगे लक्ष वेधून घेतले. झांज, ढोल, ताशा, घोषणा याने परिसर चैतन्यमय झाला होता. डॉ. शुभदा कुलकर्णी कवी प्रभाकर महाजन हे देखील शोभायात्रेत सहभागी झाले होते.मूळजी जेठा Prescription ग्रंथदिंडी समारोप झाल्यावर मराठी भाषेचा प्रवास दाखविणाऱ्या ग्रंथ व चित्र प्रदर्शनीचे उद्घाटन झाले. त्यानंतर
‘उत्सव प्रतिभेचा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केला. यात गीत – संगीत – नृत्य – नाट्य यांचा मराठमोळा आविष्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. योगेश महाले यांनी केले. प्राचार्य डॉ. संजय भारंबे, केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस अभिवादन केल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली.
समीक्षा महिरे,शुभम चव्हाण, प्रसन्ना कुलकर्णी यांनी गणेश वंदना सादर केली. तुज मागतो मी आता, माझे माहेर पंढरी, विंचू चावला, शिवाजी महाराजांच्या कीर्तीचा पोवाडा, उठा राष्ट्रवीर हो, अरे खोप्यामधी खोपा, ही मायभूमी,माझे नमन माय मराठीला या गीतांचे क्रमाने अनुजा मंजुळ, रविशंकर ठाकरे, प्रतीक्षात दुट्टे, रविशंकर ठाकरे, वैष्णवी पाटील, आकांक्षा कोळी, राजश्री मनोहर, पूजा ओझा, सोनाली पाटील, वर्षा जाधव, दिव्या पाटील यांनी केले.
दिव्या पाटील हिने केशीबास यांनी रचलेला हत्तीचा दृष्टांत म्हटला. स्नेहल सोनवणे हिने ती फुलराणी या नाटकांचा नाट्य अंश सादर केला. शीतल पाटील या विद्यार्थिनीने अहिराणी नाट्य सादर केले. नृत्याविष्कारात अश्विनी पाटील, जागृती सोनवणे, प्रांजली भोई, प्राजक्ता पाटील, सुजाता दाहिया, वैष्णवी देवरे यांनी मंगळागौर गाणं, रितिका बेलदार, प्रसन्ना कुलकर्णी, भाग्यश्री भावसार, अनुष्का परिहार, यांनी मथुरेच्या बाजारी ही गवळण, अमृता तळेले हिने मदन मंजिरी या लावणीवर, वैष्णवी सोनवणे, गौरी जगताप, सिद्धी बेलेकर,स्नेहा बेलेकर, मयुरी मगरे यांनी लल्लाटी भंडार या गाण्यावर, मायावती पावरा हिने आदिवासी नृत्य,राजश्री मनोहर, इशिका शिरसाट यांनी शिवबा आमचा मल्हारी या गाण्यावर, नीलम पाटील, नेहा मराठे, गायत्री मोरे यांनी बिज जसे अंकुरते या गाण्यावर, दीप्ती शिंदे, सुजाता दाहिया,वैष्णवी देवरे यांनी अप्सरा आली चंद्रा या लावणी गीतांवर, राजेश्वरी पाटील, जयश्री अमृतकर, वैष्णवी दीपक पाटील, वैष्णवी मंगलसिंग पाटील, यांनी मी मराठी या गाण्यांवर नृत्य केले. या सांस्कृतिक कार्यक्रमातून मध्ययुगीन काळापासून आजपर्यंत मराठी भाषेत आविष्कृत झालेल्या विविध रचनांचे सादरीकरण आणि नृत्याविष्कार याचा समावेश होता.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भारंबे, खांदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक शशीकांतजी वडोदकर, मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. भूपेंद्र केसुर, उपप्राचार्य देवेंद्र इंगळे, डॉ. सुरेखा पालवे, मनभावन रेडिओ केंद्राचे संचालक अमोल देशमुख, डॉ. विद्या पाटील, डॉ.योगेश महाले, डॉ. विलास धनवे, डॉ.अतुल पाटील, प्रा. गोपीचंद धनगर, प्रा. रेणुका झांबरे, प्रा. वर्षा उपाध्ये, अजय शिंदे तसेच इतर प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. वर्षा उपाध्ये यांनी केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम