
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेत मोठा बदल
८ लाख महिलांच्या हप्त्यात कपात, १५०० ऐवजी आता फक्त ५०० रुपये!
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेत मोठा बदल
८ लाख महिलांच्या हप्त्यात कपात, १५०० ऐवजी आता फक्त ५०० रुपये!
मुंबई | प्रतिनिधि
महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या महत्वाकांक्षी योजनेत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सुमारे ८ लाख महिलांच्या मासिक लाभात कपात करण्यात आली असून, आता त्या महिलांना १५०० रुपये ऐवजी केवळ ५०० रुपये हप्ता मिळणार आहे.
ही कपात नमो शेतकरी महासन्मान निधी (NSMN) योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांवर लागू करण्यात आली आहे. या शेतकरी योजनेअंतर्गत या लाभार्थींना आधीच दरमहा १००० रुपये मिळतात, त्यामुळे दोन्ही योजनेचा एकत्रित लाभ १५०० रुपयांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आला आहे.
‘लाडकी बहिण’ योजनेत लाभार्थ्यांची सध्या छाननी सुरू
राज्य सरकारने सध्या या योजनेत लाभ घेणाऱ्या महिलांची स्क्रूटनी सुरू केली असून, यातून ही माहिती समोर आली आहे. सरकारचा दावा आहे की या निर्णयामुळे योजना अधिक पारदर्शक आणि गरजू महिलांपर्यंत पोहोचेल.
ऑक्टोबर २०२४ मध्ये या योजनेसाठी तब्बल २.६३ कोटी अर्ज प्राप्त झाले होते. मात्र फेब्रुवारी २०२५ मध्ये ही संख्या २.५२ कोटींवर आली. तपासणीनंतर ही संख्या पुढील काही महिन्यांत आणखी १० ते १५ लाखांनी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लाभार्थ्याचे वय १८ ते ६५ वर्षांदरम्यान असावे
लाभार्थी महाराष्ट्राचे रहिवासी असावेत
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे
घरात कार असल्यास किंवा कोणी सदस्य सरकारी नोकरीत असल्यास लाभ मिळणार नाही
अन्य कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेत असल्यास, ‘लाडकी बहिण’ योजनेचा एकूण हप्ता १५०० रुपयांपेक्षा अधिक मिळणार नाही
या निर्णयामुळे काही महिला संघटनांनी नाराजी व्यक्त केली असून, “एका घरात वेगवेगळ्या योजनेचे लाभ घेणारे सदस्य असू शकतात,” असा युक्तिवाद केला आहे. मात्र सरकारने हे पाऊल वित्तीय शिस्त आणि दुहेरी लाभ टाळण्यासाठी आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की ही योजना गरजू महिलांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावी, यासाठी ही छाननी अत्यावश्यक आहे. पुढील काही महिन्यांत या योजनेविषयी अधिक स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम