
रसलपूरमध्ये अवैध गोवंश कत्तलीचा पर्दाफाश
७४० किलो मांसासह चौघे अटकेत, चौघे फरार
रावेर (प्रतिनिधी) – रावेर तालुक्यातील रसलपूर गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत गोवंश कत्तलखाना उद्ध्वस्त केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकत चार आरोपींना ताब्यात घेतले असून, चौघे घटनास्थळावरून पसार झाले. कारवाईत सुमारे ७४० किलो गोमांस, कातडी व धारदार शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे व त्यांच्या पथकाने केली. रसलपूर येथील कुरेशी मोहल्ल्यात मरीमाता मंदिराच्या पाठीमागे एका मोकळ्या जागेत गोवंश जातीच्या जनावरांची बेकायदेशीर कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ छापा टाकला.
घटनास्थळी आठजण कत्तलीचे काम करत असल्याचे आढळून आले. पोलिसांच्या कारवाईदरम्यान चारजणांना ताब्यात घेण्यात आले असून, उर्वरित चौघे फरार झाले. अटकेत घेतलेल्यांमध्ये शेख वसीम शेख कय्युम कुरेशी (२५), शेख शकील शेख कलीम कुरेशी (२४), शेख सलीम शेख उस्मान कुरेशी (६०) आणि शेख अनिस शेख अय्युब कुरेशी (३२) यांचा समावेश आहे. फरार आरोपींची नावे शेख नुरअहमद शेख सलीम, शेख फारुख शेख अय्युम, शेख समीर शेख कय्युम आणि शेख फरीद शेख शब्बीर (सर्व रा. कुरेशी वाडा, रसलपूर) अशी असून, त्यांचा शोध सुरू आहे.
या कारवाईत पोलिसांनी अंदाजे १.४८ लाख रुपये किंमतीचे ७४० किलो गोमांस, चार जनावरांची कातडी, चार कुऱ्हाडी (कीमत ₹१,२००) आणि चार सुरे (कीमत ₹८००) असा एकूण मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त मांसाचे नमुने तपासणीसाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले असून, उर्वरित मांस रावेर नगरपालिकेच्या मदतीने कचरा डेपोत नष्ट करण्यात आले.
अटकेत असलेल्या आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास रावेर पोलीस करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम