राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत कवी अशोक सोनवणे तृतीय
बातमीदार | दि २ जानेवारी २०२४
राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत कवी अशोक सोनवणे तृतीय अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे अंतर्गत उत्तर महाराष्ट्र व नाशिक जिल्हा यांच्यावतीने परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जेष्ठ साहित्यिक देविदास खडताळे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित काव्य स्पर्धेत चोपडा येथील ज्येष्ठ कवी अशोक नीलकंठ सोनवणे यांच्या ‘विडा’ या कवितेस तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे.
कवी अशोक सोनवणे हे सातत्याने विविध विषयांवर लेखन करीत असून त्यांचे अनेक कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना राज्य शासनाचा बाल साहित्यिक पुरस्कार व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त असून ते निवृत्त मुख्याध्यापक आहेत.
तसेच ते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चोपडा शाखेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.
खडताळे काव्य स्पर्धेचा निकाल परिषदेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्हा अध्यक्ष नवनाथ अर्जुन गायकर यांनी नुकताच घोषित केला आहे.
या स्पर्धेत पुण्याच्या श्रीमती प्रज्ञा घोडके यांच्या ‘समर्पण’ या कवितेस प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक सोलापुर येथील प्रा.इंद्रजीत पाटील यांच्या ‘टोळीतली दिवाळी’ या कवितेस जाहिर झाला आहे.
ही स्पर्धा दरवर्षी आयोजीत करण्यात येत असून यंदा या स्पर्धेचे पाचवे वर्ष आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र भरातून १७५ कवींनी भाग घेतला होता.
विजेत्या कवींचे परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, प्रदेश अध्यक्ष फुलचंद नागटिळक, प्रदेश उपाध्यक्ष देविदास खडताळे आदीसह विविध पदाधिकारी व चोपडा मसाप शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याबाबतची घोषणा लवकरच करण्यात येईल, अशी माहिती गायकर यांनी दिली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम