राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सावधगिरीचा सल्ला

बातमी शेअर करा...

राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सावधगिरीचा सल्ला
कोकणात दमदार हजेरी, तर मराठवाडा-विदर्भात अजूनही पावसाची प्रतीक्षा

मुंबई – १६ जून

राज्यात तब्बल १८ दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सूनचा प्रवास पुन्हा सुरु झाला असून, १६ जूनपासून कोकण, मध्य महाराष्ट्र व काही विदर्भ भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र, विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील काही भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे अशा भागांतील कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता जमिनीत पुरेसा ओलावा झाल्यावरच शेतीची तयारी करावी, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.

गेल्या २४ तासांत मुंबईसह कोकणात जोरदार पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ व मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा, तर पूर्व विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. राज्यातील इतर भागांत मात्र हवामान कोरडे राहिले.

१ ते १६ जून या कालावधीत कोकण व गोवा उपविभागात सरासरीच्या तुलनेत २२ टक्के अधिक पाऊस झाला आहे. परंतु, मध्य महाराष्ट्रात १ टक्का, मराठवाड्यात २६ टक्के आणि विदर्भात तब्बल ६१ टक्के पावसाची कमतरता नोंदविण्यात आली आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, हिंगोली, बीड आणि खानदेशातील काही तालुक्यांमध्ये पावसाची परिस्थिती चिंताजनक आहे.

राज्यातील १३४ तालुक्यांत ६५ मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली असून, त्यापैकी ८४ तालुक्यांत सरासरी किंवा त्याहून अधिक पाऊस झालेला आहे.

२२ जूनपर्यंत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यांमध्ये समाधानकारक पावसाची शक्यता आहे. मात्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस विस्कळीत स्वरूपात राहण्याची शक्यता आहे. दक्षिण मराठवाडा तुलनेने कोरडाच राहू शकतो, तर पूर्व विदर्भात थोड्या अधिक प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

दरम्यान, पुढील आठवडाभरात कुठेही मुसळधार वा अति मुसळधार पावसाची शक्यता नसल्यामुळे, ज्या भागांमध्ये अद्याप जमीन ओलसर नाही, तेथे शेतकऱ्यांनी तांत्रिक मार्गदर्शन घेऊनच पुढील शेती कामे हाती घ्यावीत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम