
रावेरमध्ये दुचाकी चोरटा मध्यप्रदेशातून जेरबंद; चोरीची गाडी हस्तगत
रावेरमध्ये दुचाकी चोरटा मध्यप्रदेशातून जेरबंद; चोरीची गाडी हस्तगत
रावेर: येथील रावेर पोलिसांनी एका दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास करत मध्यप्रदेशातून एका सराईत दुचाकी चोरट्याला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेली दुचाकीही हस्तगत केली असून, या कारवाईमुळे रावेर गुन्हे शोध पथकाचे मोठे यश समोर आले आहे.
१८ ऑगस्ट रोजी पंकज शिवनाथ मशाने (रा. उटखेडा रोड, रावेर) यांनी त्यांची होंडा कंपनीची मोटारसायकल (क्र. एमएच-१८-सीएम-३६६७) रावेर येथील एचडीएफसी बँकेबाहेर पार्क केली होती. सकाळी ९ वाजता ते बँकेत गेले असता, दुपारी १ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दुचाकीचे लॉक तोडून ती चोरून नेली. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर रावेर गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. त्यांनी बँकेबाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एक व्यक्ती दुचाकी चोरून नेताना दिसला. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी रावेर, पाल आणि खानापूर येथील ३५ हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र आरोपीची ओळख पटत नव्हती.
सततच्या प्रयत्नांनंतरही सुगावा लागत नसल्याने पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांनी पुन्हा एकदा तपास सुरू केला. त्यांनी सीसीटीव्हीमधील आरोपीच्या पेहरावावरून तो पालजवळील दुर्गम भागातील असावा असा अंदाज वर्तवला. याच अंदाजानुसार शोध पथकाने तपास सुरू ठेवला आणि अखेर आरोपीची ओळख पटली. आरोपीचे नाव लाला कारसिंग तडोले (वय ३२, रा. जनकपुरा, बोरीबुर्जग, जि. बुरहानपूर, मध्य प्रदेश) असे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चोरीला गेलेली दुचाकी जप्त केली.
आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून, पोलिसांनी त्याला पोलीस कोठडीची मागणी केली आहे. या कोठडीत आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वाखालील पथकात ईश्वर चव्हाण, कल्पेश आमोदकर, श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी, तसेच सायबर पोलीस स्टेशनचे मिलिंद जाधव आणि गौरव पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार किशोर सपकाळे करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम