बातमीदार | दिं ३ जानेवारी २०२४
राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात महिला मंडळ शाळेची वैष्णवी माळी प्रथम
चोपडा येथे ५१ व्या तालुका विज्ञान प्रदर्शनात महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाची इयत्ता नववीची विद्यार्थी कु. वैष्णवी दीपक माळी हिच्या ‘वाहतूक व दळणवळण अंतर्गत ऊर्जा निर्मिती’ या उपकरणाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
या गुणवत्तेच्या आधारावर जिल्हा परिषदेतर्फे ५० व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाला भेट देण्यासाठी व तेथील निवडक उपकरणांची माहिती मिळवण्यासाठी कु. वैष्णवी माळी हीची निवड करण्यात आली होती.
सोबत विद्यालयातील विज्ञान शिक्षक विजय पाटील यांनीही या प्रदर्शनात सहभाग नोंदवला. जळगाव जिल्हा परिषदेतर्फे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांना बालेवाडी, पुणे येथील या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनासाठी पाठविण्यात आले होते.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली व महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागातर्फे बालेवाडी (पुणे) येथील श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे ५० व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन २०२३ चे आयोजन दि. २६ ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यान करण्यात आले होते.
मुलांमधील नैसर्गिक जिज्ञासूवृत्ती व नवनिर्मिती क्षमतेला तसेच वैज्ञानिक दृष्टीला मंच उपलब्ध करुन देणे हा या प्रदर्शनामागील हेतू होता. देशभरातील विविध राज्यामधील १६७ विद्यालयांमधील २७० विद्यार्थी व १८० शिक्षक यात सहभागी झाले होते.
पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावरील एखाद्या कार्यक्रमात सहभागी होता आले. या प्रदर्शनातून नवीन कल्पना, सादरीकरण, करावयाची तयारी यासारख्या अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.
ही प्रेरणा पुढील वाटचालीसाठी नक्कीच कामी येईल. माझ्या शाळेने आणि जिल्हा परिषदेने ही संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल खूप आनंद होत आहे, अशी भावना कु. वैष्णवी माळी हिने व्यक्त केली.
राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात सहभागी होणारी ती तालुक्यातील पहिलीच शालेय विद्यार्थिनी आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम