
लग्नाच्या चार दिवस आधी उपवर मुलगी पळून गेली; लहान बहिणीसोबत लावले लग्न
लग्नाच्या चार दिवस आधी उपवर मुलगी पळून गेली; लहान बहिणीसोबत लावले लग्न
तरुणी कॉलनीतीलच तरुणासोबत फरार; समाजातील बदनामी टाळण्यासाठी कुटुंबीयांचा निर्णय
जळगाव – लग्नाच्या अवघ्या चार दिवस आधी वधू पसंती नसलेल्या नवरदेवाशी लग्न टाळण्यासाठी घरातून गायब झाली. कॉलनीतील एका तरुणासोबत ती फरार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या धक्कादायक प्रकारानंतर समाजातील बदनामी टाळण्यासाठी कुटुंबीयांनी वधूच्या लहान बहिणीचेच वरासोबत लग्न लावून दिले. ही घटना शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलिसांनी तरुणीच्या हरविल्याची नोंद घेतली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक तरुण काही महिन्यांपूर्वी कामानिमित्त जळगावात नातेवाईकांकडे राहण्यास आला होता. या काळात त्याचे त्याच कॉलनीत राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळले. काही महिन्यांपूर्वी ती तरुणासोबत घरातून पळूनही गेली होती, मात्र दोघे काही दिवसांनी घरी परतले.
त्यामुळे कुटुंबीयांनी या मुलीचे लग्न नात्यातील एका तरुणाशी ठरवले. मुलीच्या पसंतीशिवाय ठरवण्यात आलेल्या या लग्नाची जय्यत तयारी सुरू असताना, खरेदीसाठी गेलेल्या दिवशी वधू अचानक घरातून गायब झाली. याचवेळी पुन्हा तो तरुणही कॉलनीतून गायब झाल्याने दोघे पुन्हा एकत्र पळून गेल्याचा संशय बळावला आहे.
या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी हरविल्याची नोंद घेतली आहे. दुसरीकडे, लग्नाची सर्व तयारी झाल्याने आणि चार दिवसांचा कालावधीच शिल्लक असल्याने समाजातील नाहक बदनामी टाळण्यासाठी कुटुंबीयांनी उपवर मुलीच्या लहान बहिणीसोबतच ठरवलेल्या वराचे लग्न लावून दिले.
या प्रकरणाची चौकशी शहर पोलीस करत असून, फरार तरुण व तरुणीचा शोध घेतला जात आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम