
वाळू तस्करीच्या वादातून तलवार-कोयत्याने तिघांवर जीवघेणा हल्ला
वाळू तस्करीच्या वादातून तलवार-कोयत्याने तिघांवर जीवघेणा हल्ला
भडगावात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
भडगाव (प्रतिनिधी) – वाळू तस्करीच्या जुन्या वैमनस्यातून चार जणांच्या टोळीने वाक गावात रस्त्यावर गाडी अडवून तलवार, कोयता आणि लाकडी दांडक्यांनी तिघांवर क्रूर हल्ला केला. गुरुवारी (२ मे) रात्री ११.३० वाजता घडलेल्या या घटनेत तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर धुळे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भडगाव पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
राकेश सुधाकर पाटील (वय २८, रा. वाक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते कुटुंबीयांसह गाडीतून जात असताना इंडिका व्हिस्टा (MH-42-AU-4249) गाडीने त्यांच्या वाहनाला धडक दिली. त्यानंतर आरोपी योगेश कैलास पाटील, उमेश शालीक पाटील, सतिष शालीक पाटील आणि अक्षय बारकू पाटील यांनी राकेशवर तलवारीने हल्ला करत त्यांच्या डाव्या मनगटाला गंभीर जखम केली. मदतीला धावलेले राकेशचे वडील सुधाकर पाटील आणि काका किशोर पाटील यांनाही लाठ्या-कोयत्याने मारहाण करण्यात आली.
“कापून टाका” – आरोपींची धमकी हल्ल्यादरम्यान आरोपी “सोडू नका, कापून टाका” अशा धमक्या देत दहशत पसरवत होते. कुटुंबीयांनी जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले, परंतु आरोपींनी रुग्णवाहिका अडवण्याचा प्रयत्न केला.
तपासाला गती या घटनेनंतर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत आरोपींविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पाटील तपास करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम