
विद्यापीठाचा आंतरमहाविद्यालयीन युवारंग युवक महोत्सवाची तयारी पुर्ण
विद्यापीठाचा आंतरमहाविद्यालयीन युवारंग युवक महोत्सवाची तयारी पुर्ण
जळगाव प्रतिनिधी) :- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा आंतरमहाविद्यालयीन युवारंग युवक महोत्सवाची तयारी पुर्ण झाली असून पाचही रंगमंच सज्ज झाले आहेत, उद्या दि. ०८ ऑक्टोबर पासून संघाचे आगमन होणार असून त्यांची नोंदणी केली जाणार आहे तसेच सायंकाळी ६ वाजता संगीत आनंदमठ या महानाट्याचा प्रयोग सादर केला जाणार आहे.
यंदाचा युवक महोत्सव जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट (स्वायत्त) येथील प्रांगणात होत असून रंगमंच सज्ज झाले आहेत. युवारंगाची २५ वर्षाच्या गौरवशाली परंपरा कायम ठेवत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग व जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने हा युवक महोत्सव घेण्यात येत आहे. या युवक महोत्सवात “वंदे मातरम १५०” संकल्पना केंद्रस्थानी ठेवण्यात आली आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीला दिशा देणाऱ्या क्रांतीची ज्वाला पेटविणाऱ्या आणि राष्ट्रभक्तीच्या चेतनेला आकार देणाऱ्या बक्कीमचंद्र चटर्जी यांच्या वंदे मातरम या राष्ट्रगीताला आणि आनंद मठ या कादंबरीला १५० वर्षे पूर्ण होत आहे. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधत यंदाचा युवक महोत्सव कलात्मक, संस्कृती आणि राष्ट्रभक्तीचा भव्य महासंगम होणार आहे.
या युवक महोत्सवाच्या तयारीचा कुलगुरू प्रा. व्ही एल. माहेश्वरी यांनी आढावा घेतला आहे. या युवक महोत्सवाकरिता पाचही रंगमंच सज्ज झाले असून तयारी पूर्ण झाली असल्याचे संचालिका प्रा. प्रीती अग्रवाल व प्रा. संजय शेखावत तसेच विद्यार्थी विकास विभागाचे प्रा. जयेंद्र लेकुरवाळे यांनी सांगितले.
या महोत्सवा करिता विविध पंचवीस समिती तयार केली असून मुलींच्या निवासाची व मुलांच्या निवासासाठी स्वतंत्र व्यवस्था वेगवेगळ्या इमारतींमध्ये करण्यात आली आहे. या युवक महोत्सवात सहभागी संघांसाठी भोजन व्यवस्था देखील महाविद्यालयाच्या आवारातच करण्यात आली आहे एकूण ११४ महाविद्यालयांनी या युवक महोत्सवात सहभागी होत असून महाविद्यालयांच्या व्यवस्थापकांसह एकूण १८०० विद्यार्थी या युवक महोत्सवात आपल्या विविध कला सादर करून युवारंगात रंगून जाणार आहेत.
या महोत्सवासाठी सज्ज करण्यात आलेले रंगमंच क्र. १ बकिमचंद्र चटोपाध्याय सभागृह, रंगमंच क्रमांक २ स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, रंगमंच क्रमांक ३ कवी प्रदीप सभागृह, रंगमंच क्रमांक ४ कवी प्रेम धवन सभागृह आणि रंगमंच क्रमांक ५ राष्ट्र संत तुकडोजी महाराज सभागृह असे आहेत.
संगीत आनंदमठ महानाट्याचा प्रयोग
दि ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ऋषी बंकीमचंद्र चटपोध्याय यांच्या आनंदमठ या अजरामर कादंबरीवर आधारित कोलाज क्रिएशन पुणे निर्मित मातृभूमीच्या उत्कट प्रेमाची अनुभूती देणारे अलौकीक संगीत आनंदमठ हे नाटक सादर केले जाणार आहे.
उदघाटन समारंभ
दिनांक ९ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष अशोक जैन हे उपस्थित राहतील. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही एल माहेश्वरी हे असून रायसोनी एज्युकेशनचे चेअरमन सुनील रायसोनी व प्र. कुलगुरू प्रा. एस. टी इंगळे यांच्यासह विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व स्वागताध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, युवारंग चे कार्याध्यक्ष नितीन झाल्टे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांच्या समवेत विविध विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिसभा सदस्य, विद्या परिषद सदस्य व रायसोनी एज्युकेशन चे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम