
विद्यापीठात ‘बौद्धिक संपदा हक्क’ प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या बॅचचा शुभारंभ
विद्यापीठात ‘बौद्धिक संपदा हक्क’ प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या बॅचचा शुभारंभ
जळगाव (प्रतिनिधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘बौद्धिक संपदा हक्क’ (Intellectual Property Rights) या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या बॅचचा शुभारंभ करण्यात आला. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांच्या उपस्थितीत या अभ्यासक्रमाच्या माहितीपत्रकाचे औपचारिक अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विभागाचे समन्वयक प्रा. विकास गीते यांनी या अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती दिली. तसेच यावर्षीपासून विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि इंटर्नशिपची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. विज्ञान विषयातून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या रोजगारक्षम अभ्यासक्रमात प्रवेश घेता येणार असल्याने, इच्छुकांनी अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी विद्यापीठाकडून बौद्धिक संपदा हक्क नोंदणीसाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना पेटंट एजंट किंवा पेटंट तपासनीस सारख्या पदांसाठी होणाऱ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास मदत होईल, तसेच दर्जेदार पेटंट नोंदणीस चालना मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. आजच्या संशोधनप्रधान युगात बौद्धिक संपदा हक्कांचे वाढते महत्त्व अधोरेखित करताना, समाजोपयोगी व नाविन्यपूर्ण संशोधनावर भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास बौद्धिक संपदा हक्क विभागाचे पीठासीन प्राध्यापक डॉ. डी. जी. हुंडीवाले, रसायनशास्त्र विभागाचे संचालक प्रा. दीपक दलाल, संशोधक विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सारंग बारी यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्री. मयूर पाटील यांनी मानले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम