
विद्वत्ता गरीब व ग्रामीण भागातील मुलांमध्येही आहे – अनुप कुमार
महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त कार्यक्रम
विद्वत्ता गरीब व ग्रामीण भागातील मुलांमध्येही आहे – अनुप कुमार
महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त कार्यक्रम
जळगाव (प्रतिनिधी) विद्वत्ता गरीब व ग्रामीण भागातील मुलांमध्येही असते त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास हे विद्यार्थीही चांगले करीअर घडवून किंवा सातासमुद्रापार जाऊन स्वत्:ला सिध्द करु शकतात असे प्रतिपादन वर्धा येथील नालंदा अकादमीचे संचालक अनुप कुमार यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सुरू असलेल्या क्रांतीसुर्य महात्मा फुले व ज्ञानसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी होते. यावेळी मंचावर प्र-कुलगुरु प्रा.एस.टी. इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. पवित्रा पाटील, प्रा.म.सु.पगारे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, प्रा. आर.जे. रामटेके, समितीचे समन्वयक डॉ.उमेश गोगडीया, सहसमन्वयक सुभाष पवार उपस्थित होते.
अनुप कुमार यांनी ‘जागतिक उच्च शिक्षणातील संधी आणि बाबासाहेबांच्या विचारांची प्रासंगिकता ’ या विषयावर मांडणी केली. ते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली समानता आणायची असेल तर सर्व स्तरातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेणे हे महत्वाचे आहे. विव्दवत्ता गरीब व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही असते मात्र त्यांनी शिक्षणात आवड निर्माण करावी. या मुलांना मार्गदर्शन व संधी मिळायला हवी. सद्यस्थितीत इंग्रजी भाषेची भिती हा मोठा अडसर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असतो ती भिती दूर करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. शिक्षण हे केवळ रोजगारासाठी नव्हे तर ज्ञान संपादनासाठी असावे. देशात विद्यार्थ्यांसाठी करीअरच्या संधी विविध क्षेत्रात आहेत मात्र त्यांची माहिती शेवटच्या स्तरापर्यंत पेाहचत नाही. असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोपात कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांनी सांगितले की, जागतिकस्तरावर भारताला अव्वलस्थानी न्यायचे असेल तर देशातील सर्व नागरीक शिक्षित असणे आवश्यक आहे. महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यातून प्रेरणा विद्यार्थ्यांनी घ्य्यावी. भारत देशात सर्वात जास्त तरुणांची संख्या आहे. विद्यार्थ्यानी ते जे शिक्षण घेत आहे त्यात आवड निर्माण करावी व भारताला बलशाली करण्याची जबाबदारी स्वीकारावी. प्रारंभी या महोत्सव समितीचे समन्वयक प्रा. उमेश गोगडीया यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अनिल डोंगरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. पवित्रा पाटील यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. माधुरी महाजन हिने भीम जयंती गीत सादर केले. संशोधक विद्यार्थी खेमराज पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. सुभाष पवार यांनी यांनी आभार मानले.
क्रांतीसुर्य महात्मा फुले व ज्ञानसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त विद्यापीठात महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेची प्रचंड जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीत विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेतर अधिकारी, कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्साह वाढवला. या मिरवणूकीत प्रा. अभय मनसरे यांनी महात्मा फुले, देवयानी चौधरी हिने सावित्रीबाई फुले, संदीप वानखेडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर तर यज्ञा चौधरी या विद्यार्थिनीने रमाई आंबेडकर यांची वेशभूषा परीधान केली होती. महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे विविध पोस्टर्स तसेच पताका चौकात व यावेळी विविध ठिकाणी लावण्यात आले होते. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारा पासून सुरू झालेल्या या मिरवणूकीचा प्रशासकीय इमारतीजवळ समारोप झाला. यावेळी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, प्रा.म.सु.पगारे, प्रा.जे.बी.नाईक, प्रा.राकेश रामटेके, प्रा. किशोर पवार, डॉ.उमेश गोगडीया, डॉ. अनिल डोंगरे, प्रा.रमेश सरदार, प्रा. विशाल पराते, डॉ. अजय सुरवाडे, राजू सोनवणे, अरुण सपकाळे, जयंत सोनवणे, भीमराव तायडे, सुभाष पवार आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम