
औरंगाबाद दि ३१ ऑगस्ट | शेती हा आपल्या देशाचा प्रमुख व्यवसाय आहे. शेतीमध्ये नव तंत्रज्ञानाचा वापर होणे आवश्यक आहे. यासाठी बीज उद्योग, खत कंपनी तसेच शेतीशी निगडित सर्व उद्योगांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केल्या जातील. नव तंत्रज्ञानाच्या वापरातून बळीराजाला सक्षम करणे गरजेचे असल्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
फर्टीलायझर, सीड्स व मायक्रोनुट्रीयंट्स संस्थेच्यावतीने शहरात आयोजित बैठकीत कृषी मंत्री अब्दुल सत्तार बोलत होते.
कृषी मंत्री म्हणाले, शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील आहे. बळीराजाने शेतीसोबतच जोड व्यवसाय करणे गरजेचे आहे. गटशेती शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे यासाठी प्रोत्साहन द्यायला पाहिजे.
शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पदाधिकारी, अधिकारी यांनी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहून संवाद साधणे, प्रत्येक अडचणी समजून घेणे यासाठी कृषी विभागातर्फे ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी ‘ हा उपक्रम १ सप्टेंबर पासून ३० नोव्हेंबर पर्यंत राज्यात राबविण्यात येत आहे. त्याचा राज्यस्तरीय शुभारंभ मेळघाटातील धारणी तालुक्यातील साद्रावाडी येथे उद्या होणार असल्याचेही कृषी मंत्री म्हणाले.
यावेळी राघवेंद्र जोशी, अजित मुळे तसेच आशुतोष बडवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम