
शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या; पाचोरा तालुक्यातील भोजे येथील घटना
शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या; पाचोरा तालुक्यातील भोजे येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील भोजे गावात शेतमजुरी करणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीने घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ३० जून रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयताचे नाव जीवन भरतगिर गोसावी (वय ४५, रा. भोजे, ता. पाचोरा) असे असून, ते शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि चार विवाहित मुली असा परिवार आहे.
२९ जून रोजी रात्री कुटुंब झोपले असताना, ३० जून रोजी पहाटे त्यांच्या पत्नी नेहमीप्रमाणे शेतीच्या कामासाठी बाहेर गेल्या. त्यावेळी घरात जीवन गोसावी व त्यांचा मुलगा उपस्थित होते. सकाळी आठनंतर जीवन गोसावी यांनी घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळाने मुलाने पाहिले असता त्यांनी आत्महत्या केल्याचे लक्षात आले.
तत्काळ ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून, कुटुंबीयांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम