संपूर्ण जगात शिक्षक दिन फक्त भारताचा साजरा होतो – कुलगुरू

रोटरी मिडटाऊनतर्फे शिक्षकांना नेशन बिल्डर अवॉर्ड

बातमी शेअर करा...

संपूर्ण जगात शिक्षक दिन फक्त भारताचा साजरा होतो – कुलगुरू

रोटरी मिडटाऊनतर्फे शिक्षकांना नेशन बिल्डर अवॉर्ड

जळगाव – शिक्षकांनी समर्पणवृत्तीने केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन संपूर्ण जगात फक्त भारताचा साजरा केला जातो असे कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांनी प्रतिपादन केले.
गणपती नगरातील डॉ. जी. डी. बेंडाळे कम्युनिटी वेल्फेअर सेंटरच्या भैय्यासाहेब नथमल लुंकड सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.व्यासपीठावर सहप्रांतपाल संजय गांधी, अध्यक्ष ॲड. किशोर बी.पाटील, मानद सचिव डी.ओ.चौधरी, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. सुमन लोढा यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना कुलगुरू डॉ. माहेश्वरी यांनी २३०० वर्षांपूर्वी चाणक्य यांनी निर्माण आणि विध्वंस हे शिक्षकांच्या कार्यावर अवलंबून असते असे म्हटले होते तर डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी उत्कृष्ट शिक्षक आणि शिक्षण ही सर्वोच्च प्राथमिकता असली पाहिजे असे मत व्यक्त केल्याचे सांगितले.
शिक्षकांनी शिकवणे हे केवळ १० टक्के काम आहे तर त्यांचे ९० टक्के
काम हे विद्यार्थ्यांना प्रेरित आणि प्रोत्साहित करणे हे आहे असे सांगून त्यांनी शिक्षक विद्यार्थ्यांना प्रभावित करतात. विद्यार्थ्यांना संस्कारित करण्याची देवाने शिक्षकांना दैवी देणगी दिली आहे असे ते म्हणाले.
चांगले शिक्षण आणि आरोग्य सेवा देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. मात्र त्यात ते अपयशी ठरले तर ती आपली सर्वांची जबाबदारी आहे असेही कुलगुरूंनी सांगितले.
दुर्दैवाने सरकारी शाळेतील शिक्षकांची मुले खाजगी शाळेत शिकतात. शासकीय हॉस्पिटल वरील सर्वसामान्यांचा विश्वास उडाला आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

रोटरी मिडटाऊनचे नेशन बिल्डर अवॉर्ड म्हणजे शिक्षकांनी समर्पणवृत्तीने केलेल्या कार्याची पावती असून विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता व संशोधन वाढीसाठीची जबाबदारी देखील त्यांनी सांभाळावी असे कुलगुरूंनी शेवटी आवाहन केले.

डॉ. प्रशांत वारके, डॉ. माया आर्वीकर, प्रा. डॉ. रश्मी शर्मा, डॉ. अपर्णा मकासरे, डॉ. काजल फिरके, छाया पाटील, काजल सुखवानी, तृप्ती बाकरे, प्रीत रावलानी, रोशनी अग्रवाल, पिंकी मंधान, सुरबाला चौधरी या रोटरी जळगाव परिवारातील शिक्षकांना रोटरी मिडटाऊनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. स्वरूप लोढा यांच्या स्मरणार्थ नेशन बिल्डर अवॉर्ड व अब्राहम लिंकन यांनी मुख्याध्यापकांना लिहिलेले पत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी सहप्रांतपाल संजय गांधी आणि सत्कारार्थींच्यावतीने डॉ. रश्मी शर्मा यांनी मनोगत व्यक्त केले. अब्राहम लिंकन यांच्या पत्राचे वाचन सुरेखा शिरुडे यांनी केले.
कुलगुरूंचा परिचय माजी अध्यक्ष डॉ.के.सी. पाटील यांनी करून दिला. स्व. डॉ. स्वरूप लोढा यांच्या कार्याची माहिती माजी अध्यक्ष अनिल एम.
अग्रवाल यांनी दिली. सूत्रसंचालन पुरुषोत्तम सारस्वत व प्रा.यशवंत सैंदाणे यांनी केले. आभार डॉ. सुमन लोढा यांनी मानले

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम