सेविंग मेहरूण लेक” शोध अहवालाचे प्रकाशन

जागतिक पाणथळ दिवस साजरा

बातमी शेअर करा...

सेविंग मेहरूण लेक” शोध अहवालाचे प्रकाशन
जागतिक पाणथळ दिवस साजरा
जल्गाव प्रतिनिधि

आज जागतिक पाणथळ दिवसाच्या निमित्ताने जळगावच्या मेहरूण तलावाच्या गणेश घाटावर YOGI (Youth Organization for Green India) च्या Youth Policy Lab कार्यक्रमांतर्गत “सेव्हिंग मेहरूण लेक” या शोध अहवालाचे प्रकाशन आणि स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

जळगाव शहराच्या ऐतिहासिक आणि पर्यावरणीय वारशाचा एक महत्त्वाचा भाग असलेला मेहरूण तलाव हा १२व्या शतकातील आहे. मात्र, पाण्याचा खालावत असलेला दर्जा, जैवविविधतेचा ऱ्हास, सांडपाणी व कचऱ्याचे गैरव्यवस्थापन, तलावकाठच्या जमिनीचा अनियंत्रित वापर आणि जलपर्णीमुळे हा तलाव संकटात सापडला आहे. या समस्यांचा सखोल अभ्यास करून ‘सेव्हिंग मेहरूण लेक’ या शोध अहवालात महत्त्वाच्या निरीक्षणांचा आणि उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे.

हा अहवाल माजी कृषी उपसंचालक अनिल भोकरे, आनंद मल्हारा, देवम गोविंदवार, तसेच मेहरूण परिसरातील नागरिक, तरुण आणि बालक प्रतिनिधींच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. याआधी उपस्थित सर्वांनी परिसरात स्वच्छता मोहीम राबवली.

सदर अहवालाचे लेखन व संशोधन आर्यन शशीधरण, मानसी औटी आणि बजरंग मगाडे यांनी केले असून, 2023-24 दरम्यान हे संशोधन पार पडले. कार्यक्रमात YOGI चे संस्थापक गिरीश पाटील यांनी YOGI च्या भूमिका विषद केली. यावेळी पर्यावरण तज्ज्ञ अभय उजागरे, डॉ. राधेश्याम चौधरी, जळगाव मनपा प्रतिनिधी प्रकाश पाटील, शिक्षण तज्ज्ञ मनोज गोविंदवार आणि अँड. सुचिता हाडा यांनी आपली मते मांडली आणि मेहरूण तलाव संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.

यावेळी विनोद बियाणी, प्रा. बोरसे, रत्नाकर पाटील, जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, डी. आर. पाटील, अजिंक्य तोतला, सागर महाजन, उमेश इंगळे, डॉ. महेंद्र काबरा आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रनील चौधरी, स्वप्नील खडसे आणि रेवार्थ गोविंदवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

या अहवालात मेहरूण तलाव संवर्धनासाठी महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत.
1. मेहरूण तलावाला पाणथळ जागा (Wetland) म्हणून कायदेशीर संरक्षण देणे
2. गाळ काढणे, विदेशी मासे व झाडांच्या प्रजातींचे निर्मूलन करणे, नैसर्गिक झऱ्यांचे पुनरुज्जीवन आणि वनीकरणाच्या उपाययोजना राबवणे यांचा समावेश होता.
3. जैवविविधतेच्या संरक्षणासाठी स्थानिक नागरिक आणि तज्ज्ञांच्या सहभागासह जळगाव मनपाने समिती स्थापन करावी.
4. पर्यावरणीय संस्था आणि तज्ज्ञांच्या मदतीने तलाव व्यवस्थापनासाठी कृती आराखडा तयार करावा
5. स्थलांतर करणाऱ्या पक्षी व माशांच्या प्रजातींच्या नियमित निरीक्षणाची व्यवस्था निर्माण करावी
6. तलाव प्रदूषण व हानिकारक कृती रोखण्यासाठी लोकजागृती मोहीम राबवावी.
7. शहरी विकासाचे धोरण पर्यावरणपूरक असावे, त्यात बफर झोन, ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर यांचा समावेश करावा, अशीही मागणी करण्यात आली.

या कार्यक्रमाद्वारे मेहरूण तलावाच्या संवर्धनासाठी सर्वसमावेशक कृती हाती घेण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. स्थानिक नागरिक, तरुण आणि प्रशासन यांनी एकत्र येऊन तलावाचे भविष्यातील अस्तित्व टिकवण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम