
अंबरनाथमध्ये बाप्पाच्या मोदकाचा लिलाव; १ लाख ८५ हजार रुपयांची बोली
अंबरनाथमध्ये बाप्पाच्या मोदकाचा लिलाव; १ लाख ८५ हजार रुपयांची बोली
अंबरनाथ: दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची अनंत चतुर्दशीला सांगता झाली. यानंतर अंबरनाथमधील ‘खाटूश्याम मित्र मंडळा’ने आपली अनेक वर्षांची परंपरा कायम राखत गणपतीसमोर ठेवलेल्या मोदकाचा लिलाव केला. या वर्षी या मोदकासाठी तब्बल १ लाख ८५ हजार रुपयांची विक्रमी बोली लागली.
अंबरनाथ पश्चिमेच्या बुवापाडा परिसरात गेली ३३ वर्षे ‘खाटूश्याम मित्र मंडळ’ सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत आहे. मंडळाकडून गणेशोत्सवादरम्यान वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि त्यासोबतच मोदकाचा लिलाव करण्याची एक अनोखी परंपरा त्यांनी सुरू केली आहे.
मंडळाकडून दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या दोन दिवस आधी एक मोठा मोदक गणपती बाप्पाजवळ ठेवला जातो आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्याचा लिलाव केला जातो. हा मोदक विकत घेतल्याने वर्षभर भरभराट होते, अशी स्थानिक लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे अनेक भाविक या लिलावात मोठ्या संख्येने सहभागी होतात.
यावर्षी अनामिका त्रिपाठी यांनी १ लाख ८५ हजार रुपयांची सर्वोच्च बोली लावून हा मोदक विकत घेतला. त्यांनी हा मोदक त्यांचे वडील प्रमोदकुमार चौबे यांना भेट म्हणून दिला. मंडळाचे अध्यक्ष असलेले प्रमोदकुमार चौबे यांनी यावेळी, जो कोणी हा मोदक विकत घेतो, त्याच्यावर बाप्पाची वर्षभर कृपादृष्टी राहते, असा विश्वास व्यक्त केला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम