अंबरनाथमध्ये ‘सिव्हिक सेंटर’ उभारण्यात येणार

खासदार आणि आमदार निधीतून होणार काम

बातमी शेअर करा...

अंबरनाथमध्ये ‘सिव्हिक सेंटर’ उभारण्यात येणार

खासदार आणि आमदार निधीतून होणार काम
अंबरनाथ (प्रतिनिधी) – अंबरनाथ शहरात नागरिकांसाठी एक महत्त्वाची सुविधा निर्माण होत असून, लवकरच सूर्योदय हॉलच्या मागील परिसरात ‘सिव्हिक सेंटर’ उभारले जाणार आहे. ही बहुउद्देशीय इमारत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या निधीतून उभारली जाणार असून, यामध्ये सुयोग महिला मंडळासह नागरिकांसाठी विविध उपयुक्त सुविधा उपलब्ध असणार आहेत.

सदर ठिकाणी पूर्वी एक व्यायामशाळा होती, जी आता जीर्ण व धोकादायक झाली आहे. या जागेत सार्वजनिक उपक्रम राबवणे अशक्य झाल्याने माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी सातत्याने पाठपुरावा करत नवीन इमारतीची मागणी केली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश येत जिल्हाधिकाऱ्यांची मंजूरीही प्राप्त झाली आहे.

सुयोग महिला मंडळासाठी स्वतंत्र जागा
सुयोग महिला मंडळ ही अंबरनाथमधील एक जुनी व नोंदणीकृत संस्था असून, महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम, शिबिरे, व्याख्याने यांचे आयोजन या संस्थेतून करण्यात येते. या मंडळासाठी नवीन इमारतीच्या तळमजल्यावर स्वतंत्र जागा राखून ठेवण्यात आली आहे.

पुस्तक वाचनालय आणि सुविधांचे केंद्र
या प्रस्तावित बहुमजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ‘पुस्तक वाचन केंद्र’ देखील उभारण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना वाचनाची सवय लागेल आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शांत व सुरक्षित जागा उपलब्ध होईल.

या उपक्रमामुळे अंबरनाथ शहरातील सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळणार असून, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांचे स्थानिक नागरिकांकडून आभार मानले जात आहेत.

 

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम