
अक्कलकोट हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावात आंदोलन : संभाजी ब्रिगेडसह परिवर्तनवादी संघटनांचा सहभाग
अक्कलकोट हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावात आंदोलन : संभाजी ब्रिगेडसह परिवर्तनवादी संघटनांचा सहभाग
जळगाव (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावात संभाजी ब्रिगेड व परिवर्तनवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत संतप्त आंदोलन केले. या प्रसंगी गायकवाड यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करून श्रद्धा व्यक्त करण्यात आली. तसेच हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नसून, समता, बंधुता आणि विचारस्वातंत्र्याच्या मूल्यांवर असल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. कार्यकर्त्यांनी या घटनेची तुलना नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश आणि एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्यांशी केली.
१३ जुलै रोजी अक्कलकोट येथे दीपक काटे या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने आठ ते दहा साथीदारांसह गायकवाड यांच्यावर शाईफेक, धक्काबुक्की आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. आश्चर्य म्हणजे, स्थानिक पोलिसांनी आरोपींना अटक न करता मुक्त सोडल्याची माहिती मिळाल्यानंतर संतापाची लाट उसळली.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक श्याम पाटील, जिल्हाध्यक्ष तुषार सावंत, शहर कार्याध्यक्ष मयूर चौधरी, लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, बामसेफचे मुकुंद सपकाळे, मराठा सेवा संघाचे सुरेश पाटील, सुरेंद्र पाटील, राम पवार, शोभाराम प्रतिष्ठाचे नरेंद्र पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले.
या आंदोलनातून सरकारला ठाम इशारा देण्यात आला की, विचारवंतांवरील हल्ल्यांना रोखण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अन्यथा याला व्यापक जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त होईल. लोकशाही आणि सामाजिक न्यायाच्या रक्षणासाठी ही लढाई अधिक तीव्र करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम