अखंड भारताच्या निर्मितीमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान अतुलनीय” – जिल्हाधिकारी रोहन घुगे

बातमी शेअर करा...

अखंड भारताच्या निर्मितीमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान अतुलनीय” – जिल्हाधिकारी रोहन घुगे

राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त जळगावात पदयात्रेचे आयोजन

जळगाव,   : राष्ट्रीय एकता दिवस आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आज जळगाव शहरात “Sardar@150 Unity March” या उपक्रमांतर्गत पदयात्रा उत्साहात पार पडली. या प्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, आपण आज जो अखंड आणि एकसंघ भारत अनुभवत आहोत, त्या अखंड भारताच्या निर्मितीमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांनी संस्थानांचे विलिनीकरण करून अखंड भारताची पायाभरणी केली. संविधान समितीचे ते सदस्य होते. भारताला घडवण्यामध्ये व एकसंघ करण्यात त्याचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.

ही पदयात्रा युवक कार्य व क्रीडा मंत्रालयांतर्गत MY Bharat या उपक्रमाद्वारे आयोजित करण्यात आली होती. सकाळी ९ वाजता महानगरपालिका टॉवर चौकातील सरदार पटेल पुतळा येथून पदयात्रेची सुरुवात झाली. पुढे ही पदयात्रा चित्रा चौक, बेंडाळे चौक, न्यू बी.जे. मार्केट, पांडे चौक, बीएसएनएल कार्यालय मार्गे जात सरदार वल्लभभाई हॉल येथे संपन्न झाली. उपस्थित अधिकारी, विद्यार्थी, स्वयंसेवक आणि नागरिकांनी या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिनाची शपथ घेतली आणि “आत्मनिर्भर भारत” निर्मितीचा संकल्प केला.

जिल्हाधिकारी घुगे यांनी पुढे म्हणाले की, 31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबरदरम्यान राज्यभर वक्तृत्व, चित्रकला आणि रांगोळी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धांमधून युवकांना देशभक्ती आणि एकतेचा संदेश देण्यात येईल. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना 6 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय रॅलीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

कार्यक्रमादरम्यान खासदार स्मिता वाघ यांनी म्हटले की, भारत हा एक संघ असून त्याची एकता हेच आपले खरे सामर्थ्य आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील संस्थानांना एकत्र करून भारताला अखंड स्वरूप दिले, म्हणूनच त्यांना ‘लोहपुरुष’ म्हटले जाते. आपण कोणतेही कार्य करताना ‘मी भारताचा नागरिक आहे’ या भावनेने काम केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. या वेळी आमदार सुरेश भोळे यांनी सरदार वल्लभभाई पटेलांच्या विचारांनी चालण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. विद्यार्थी, अधिकारी, स्वयंसेवक आणि नागरिकांच्या सहभागाने ही पदयात्रा यशस्वी झाली. पदयात्रेत सहभागी झालेल्या सर्वांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन करत राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम