
अज्ञात वाहनाच्या धडकेत कडगाव येथील तरुण ठार
अज्ञात वाहनाच्या धडकेत कडगाव येथील तरुण ठार
गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजजवळ भीषण अपघात
जळगाव प्रतिनिधी : शहरालगत असलेल्या गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज परिसरात शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात कडगाव येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. मृत तरुणाचे नाव संजय पोपट पाटील (वय २७, रा. कडगाव, ता. जळगाव) असे आहे. अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
१२ सप्टेंबर रोजी पहाटे संजय पाटील आपल्या मित्रासह गणेश बाबुराव बाविस्कर (वय ३५, रा. कडगाव) दुचाकीवरून जळगावहून कडगावकडे जात होता. गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजसमोर पोहोचताच भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत संजय पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर गणेश बाविस्कर गंभीर जखमी झाला आहे. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.
संजय पाटील मजुरी करून आपल्या आई-वडील व बहिणीचा उदरनिर्वाह करत होता. एकुलत्या एका मुलाचा मृतदेह पाहताच आई-वडिलांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. नातेवाईक आणि मित्रपरिवाराने रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. संपूर्ण गावावर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम