
अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण मादी बिबट्या जागीच ठार
अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण मादी बिबट्या जागीच ठार
राष्ट्रीय महामार्गावरील मध्यरात्रीची दुर्घटना; परिसरात घबराट
एरंडोल प्रतिनिधी — राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर सावखेडा–मराठखेडा गावानजीक मध्यरात्री अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत सुमारे एक ते दीड वर्षे वयाची मादी बिबट्या जागीच ठार झाल्याची घटना घडली. सकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर सावखेडा–मराठखेडा परिसरासह एरंडोल तालुक्यातील जळू, पातरखेडा, भालगाव, नांदगाव आदी भागांत भीतीचे वातावरण पसरले.
घटनेची माहिती मिळताच सावखेडा–मराठखेड्याचे पोलीस पाटील संतोष पुंडलिक पाटील यांनी एरंडोल वनपरिक्षेत्र कार्यालयाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. त्यानुसार सहाय्यक वनसंरक्षक अमोल पंडित, वनपाल देविदास जाधव, वनपाल सतीश ठेलार व सहकाऱ्यांनी सकाळी आठ वाजताच्या सुमारास घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी, पारोळा यांनी जागेवरच बिबट्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर वनपरिक्षेत्र कार्यालय, एरंडोलच्या परिसरात मृत बिबट्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. सदर बिबट्या एक ते दीड वर्षांची मादी असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली.
दरम्यान, वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिबट्या एका रात्रीत २० ते ३० किलोमीटरपर्यंत भ्रमण करतो. महामार्गालगत वन्यजीवांच्या हालचाली लक्षात घेता वाहनचालकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम