
अट्टल घरफोड्याला ठोकल्या बेड्या ; एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत
अट्टल घरफोड्याला ठोकल्या बेड्या ; एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत
चोपडा शहर पोलिसांची कारवाई
चोपडा (प्रतिनिधी): चोपडा शहरातील घरफोडी प्रकरणात पोलिसांनी सराईत आरोपी प्रकाश विजय पावरा (वय २८, रा. तोरणमाळ, ता. धडगाव, जि. नंदुरबार) याला शिरपूर येथून अटक करून १ लाख ४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीवर शहादा आणि दोंडाईचा पोलीस ठाण्यात १० ते १२ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
२९ सप्टेंबरच्या रात्री विजय नारायण बाविस्कर (वय ६९, रा. देशमुख नगर, चोपडा) यांच्या घरात चोरी झाली होती. याप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे १२ ऑक्टोबर रोजी आरोपीला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याच्या २ अंगठ्या व ३ सोन्याच्या बाळया , सोन्याची साखळी (सुमारे २० हजार रुपये किंमत) ,टेक्नोस्पार्क कंपनीचा मोबाईल , चांदीची चैन व पैंजण ,यमाहा YBR-110 दुचाकी (MH 18 AF 9582) असा एकूण मुद्देमाल किंमत १,०४,७०० रुपये जप्त केला आहे.
यातील काही दागिने हे जून महिन्यात झालेल्या दुसऱ्या घरफोडी प्रकरणातील असल्याचेही पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीने चोरीचा माल वाघबडली (ता. शिरपूर) येथील शेतात मोटारसायकलमध्ये लपवून ठेवला होता.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, आणि उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात सपोनि एकनाथ भिसे, पोउपनि चेतन परदेशी, पोहवा ज्ञानेश्वर जवागे, पोशि मदन पावरा, अजिंक्य माळी, योगेश पाटील, विलास पारधी यांचा समावेश होता.
या कारवाईत चोपडा पोलिसांनी सलग दोन घरफोडी प्रकरणांची उकल करण्यात यश मिळवले असून, पुढील तपास पोउपनि चेतन परदेशी करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम