
अडावदमध्ये अंधारात ‘श्री’ विसर्जन; महावितरणच्या ढिसाळ नियोजनाचा फटका
अडावदमध्ये अंधारात ‘श्री’ विसर्जन; महावितरणच्या ढिसाळ नियोजनाचा फटका
अडावद, ता. चोपडा: अडावद येथे सातव्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली असली, तरी महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना अंधारातच हा उत्सव साजरा करावा लागला. संपूर्ण गावात केबल टाकण्याचे काम मंजूर होऊनही मुख्य रस्त्यावर ते न झाल्याने, मिरवणुकीसाठी रात्री वीज बंद करण्याची वेळ आली. यामुळे गणेशभक्तांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.
महावितरणचा निष्काळजीपणा
अडावदमध्ये तब्बल ४० हजार लोकवस्ती असूनही, रात्री १ वाजेपर्यंत संपूर्ण गाव अंधारात होते. गावातील सर्व मुख्य रस्त्यांवर केबल टाकण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. गेल्या चार महिन्यांत फक्त एकाच रस्त्यावर हे काम झाले. यंदाच्या गणेशोत्सव मंडळांनी जास्त उंचीच्या गणेशमूर्ती तयार केल्या होत्या. त्यामुळे मिरवणूक मार्गावरील तारांचा अडथळा टाळण्यासाठी मिरवणुकीपूर्वी केबल टाकण्याची सूचना ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाने महावितरणला केली होती. मात्र, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केले, ज्यामुळे गणेशभक्तांना अंधारात मिरवणूक काढावी लागली.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
अडावद हे संवेदनशील गाव असल्याने, सात तास अंधारात मिरवणूक सुरू असल्याने अनुचित प्रकार घडण्याची शक्यता होती. पोलिसांनी या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत ड्रोन मागवले होते, पण रात्रीच्या अंधारामुळे ही यंत्रणा कुचकामी ठरली. तरीही, पोलीस प्रशासनाने मोठा फौजफाटा तैनात करून मिरवणूक शांततेत पार पाडली.
उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली अडावद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी बंदोबस्ताची चोख व्यवस्था केली होती. यात चोपडा शहर, चोपडा ग्रामीण, जळगाव शहर, जिल्हापेठ, जळगाव तालुका, एमआयडीसी जळगाव या पोलीस ठाण्यांचे ५० पोलीस, ९० गृहरक्षक दलाचे जवान आणि जिल्हा नियंत्रण कक्षातील राखीव पोलीस पथक तैनात होते.
महावितरणच्या नियोजनशून्य कारभारामुळे गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले असले तरी, पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम