अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य समाज परिवर्तन घडविणारे – राणा दिलीपकुमार सानंदा

बातमी शेअर करा...

अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य समाज परिवर्तन घडविणारे – राणा दिलीपकुमार सानंदा

खामगाव (प्रतिनिधी):
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे समाज परिवर्तन घडवणारे होते. त्यांच्या गीतांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला दिशा दिली, तर कष्टकरी, शोषित, पिडीत, उपेक्षितांचा आवाज त्यांच्या लेखणीतून समाजापर्यंत पोहोचला, असे गौरवोद्गार माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी काढले.

दि. 1 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने त्यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. सानंदा बोलत होते.


समाज प्रबोधनासाठी साहित्याचा प्रभावी वापर

अण्णाभाऊ साठे यांनी कथा, कादंबऱ्या, पोवाडे आदी माध्यमांतून सामाजिक विषमता, अन्याय व भेदभावाविरोधात लेखणी चालवली. त्यांच्या गीतांनी संघर्षशील जनतेला स्फूर्ती दिली, असे श्री. सानंदा म्हणाले.


सभागृह व पुतळ्यासाठी निधीची ग्वाही

कार्यक्रमात सकल मातंग समाज बांधवांनी खामगावात अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आणि सभागृह उभारणीची मागणी केली. यावर प्रतिक्रिया देताना राणा सानंदा यांनी ही मागणी जिल्ह्याच्या पालकमंत्रीमार्फत पूर्ण करून निधी उपलब्ध केला जाईल, अशी ग्वाही दिली.


प्रमुख उपस्थिती

कार्यक्रमाला समितीचे कृष्णा नाटेकर, गजानन सोनोने, महादेव अडायके, गजेंद्र बोरकर, माजी नगराध्यक्षा सरस्वतीताई खासने, मनोज वानखडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंजाबरावदादा देशमुख, बाजार समितीचे सभापती विलाससिंह इंगळे, तसेच केशव कापले, प्रकाश दांडगे, दादाराव हेलोडे, निखील सूर्यवंशी, संघपाल जाधव, धम्मा नितनवरे आदींची उपस्थिती होती.


पुष्पहार अर्पण व घोषणांनी कार्यक्रम गगनभेदी

कार्यक्रमाची सुरुवात सकल मातंग समाज वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, लहुजी साळवे, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांना देखील अभिवादन करण्यात आले.

यावेळी “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो”, “हम सब एक हैं” अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.

कार्यक्रमाला राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव आणि जयंती उत्सव समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम