
अतिवृष्टीचा निकष शिथिल करण्याचे शेतकरी कृती समितीचे सहकारमंत्र्यांना साकडे
अतिवृष्टीचा निकष शिथिल करण्याचे शेतकरी कृती समितीचे सहकारमंत्र्यांना साकडे
चोपडा, ९ ऑक्टोबर : चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांची भीषण अवस्था लक्षात घेता, अतिवृष्टीचा निकष शिथिल करण्याची मागणी शेतकरी कृती समितीने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे. मंत्री पाटील हे चोपडा पीपल्स बँकेच्या घोडगाव शाखेच्या उद्घाटनासाठी आले असताना शेतकरी कृती समितीच्या प्रतिनिधींनी निवेदन देऊन या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले.
शेतकरी कृती समितीने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, चोपडा तालुक्यात सलग पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असून, शेतकरी संकटात सापडले आहेत. मात्र, “२४ तासांत ६५ मिमी पावसाचा” निकष पूर्ण होत नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या भरपाईपासून वंचित ठेवण्यात आले आहे. शासनाने इतर काही तालुक्यांप्रमाणेच चोपड्यातील निकष शिथिल करून शेतकऱ्यांना मदतीचा लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी शेतकरी कृती समितीच्या प्रतिनिधींनी मंत्री पाटील यांना प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करण्याचे आवाहन केले, जेणेकरून नुकसानाचे खरे चित्र समोर येईल. तसेच, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनीदेखील या विषयात मंत्री महोदयांनी लक्ष घालावे अशी विनंती केली.
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर एस. बी. पाटील, शशिकांत देवरे, शशिकांत पाटील, ललित बागुल आणि बाळासाहेब पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम