
अतिवृष्टीमुळे पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतीचे १०० टक्के नुकसान; आ किशोर पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
अतिवृष्टीमुळे पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतीचे १०० टक्के नुकसान; आ किशोर पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
पाचोरा प्रतिनिधी पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात १६, २२ व २३ सप्टेंबर रोजी झालेल्या विक्रमी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे नष्ट झाले असून शेतात पिके काढायलाही जाता येत नाही अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून दोन्ही तालुक्यांना तात्काळ ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
आमदार किशोर पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अतिवृष्टीमुळे जमिनीमध्ये पाणी साचून राहिले असून पिके कुजत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात कोणतेही उत्पन्न येणार नाही. पंचनाम्यानुसार दोन्ही तालुक्यातील पिकांचे १०० टक्के नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील दोन वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले असतानाही त्यांना भरपाई मिळालेली नाही.
यावेळी आमदारांनी शासनाकडे मागणी केली आहे की, पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांसाठी २०१९ मध्ये लागू केलेल्या निकषांप्रमाणे एनडीआरएफच्या नियमांनुसार तीनपट मदत पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनाही मिळावी.
१६ सप्टेंबर रोजी ११४.८ मि.मी., २२ सप्टेंबर रोजी १४७.८ मि.मी. तर २३ सप्टेंबर रोजी १३९.३ मि.मी. इतका पाऊस झाल्याने तालुक्याची सरासरी पर्जन्यमान १३६.४ मि.मी. वर गेले आहे. या अवकाळी पावसाने खरीप हंगाम पूर्णतः उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असून शासनाने तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे असे निवेदनात म्हटले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम