अत्यंत गंभीर अवस्थेतील गर्भवतीला डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात नवे जीवन

बातमी शेअर करा...

अत्यंत गंभीर अवस्थेतील गर्भवतीला डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात नवे जीवन

 तातडीच्या सिझेरियनसोबत जटिल ऑब्स्टेट्रिक हिस्टेक्टोमी यशस्वी

जळगाव प्रतिनिधी

भुसावळ येथील एका गर्भवती महिलेवर अत्यंत गंभीर परिस्थितीत डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तातडीची शस्त्रक्रिया करण्यात येत तिचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. दोन वेळा सिझेरियन झालेल्या या महिलेची गर्भधारणा उच्च जोखमीची असतानाच या वेळी गंभीर गुंतागुंत निर्माण झाल्याने प्रसूतीदरम्यान अतिरक्तस्त्रावाचा मोठा धोका निर्माण झाला होता.

रुग्णालयात दाखल होताच तिची तब्येत चिंताजनक असल्याचे स्पष्ट झाले. रक्तदाब धोकादायकरीत्या कमी, हार्ट रेट १४० च्या पुढे, तीव्र वेदना व अस्वस्थता अशी तिची अवस्था होती. त्यानंतर स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वैभव पाटील, डॉ. मृदूला मुंगसे, डॉ. रश्मी संघवी, डॉ. ऐश्वर्या चलवदे आणि डॉ. पल्लवी शेंडगे यांच्या टीमने क्षणाचाही विलंब न करता सिझेरियन सुरू केले.

शस्त्रक्रियेदरम्यान गर्भाशयाभोवती तयार झालेल्या गाठी आणि चुकीच्या ठिकाणी रोवलेला प्लासेंटा यामुळे सतत रक्तस्त्राव वाढत होता. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे जाणवताच शेवटचा सुरक्षित पर्याय म्हणून ऑब्स्टेट्रिक हिस्टेक्टोमी—गर्भाशय काढण्याची धारिष्ट्याची शस्त्रक्रिया—करण्याचा निर्णय घेण्यात आला. वेळेशी स्पर्धा करीत केलेली ही जटिल शस्त्रक्रिया डॉक्टरांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली.

शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला तातडीने आयसीयूमध्ये हलवून मेडीसीन विभाग प्रमुख डॉ. चंद्रय्या कांते यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रिषभ पाटील व डॉ. हर्ष मेहता यांनी सतत देखरेख ठेवत उपचार सुरू ठेवले. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून पुढील निरीक्षणासाठी तिला ठेवण्यात आले आहे.

या संपूर्ण प्रकरणातून पुन्हा एकदा समोर आले आहे की, डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील आधुनिक सुविधा, अनुभवी तज्ज्ञ व क्षणाक्षणाला घेतलेले योग्य निर्णय यामुळे गंभीर अवस्थेतील रुग्णालाही जीवनदान मिळू शकते. या टीमवर्कमुळे एका मातेला नवजीवन लाभले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम