अधिकृत वीजजोडणी घेऊनच साजरा करा नवरात्रोत्सव महावितरणचे मंडळांना आवाहन

बातमी शेअर करा...

अधिकृत वीजजोडणी घेऊनच साजरा करा नवरात्रोत्सव महावितरणचे मंडळांना आवाहन

जळगाव : सोमवारपासून घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी नवरात्रोत्सव मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेऊनच उत्सव साजरा करावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

महावितरणने सार्वजनिक उत्सव मंडळांसाठी तात्पुरती वीजजोडणी देण्याची व्यवस्था केली असून केवळ घरगुती दरात वीज जोडणी देण्यात येते. उत्सवातील रोषणाई, आकर्षक देखावे, मंडप, महाप्रसाद आणि इतर कार्यक्रमांसाठी लागणारी वीज व्यवस्था फक्त अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घ्यावी. बेकायदेशीर आणि अनधिकृत वीजजोडण्यांमुळे शॉर्ट सर्किट किंवा इतर गंभीर अपघात होण्याचा धोका असतो. त्यामुळे सुरक्षेशी कोणतीही तडजोड न करता अर्ज करताच मंडळांना तात्पुरती वीज जोडणी दिली जाईल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मंडपातील विजेचे वायरिंग सुव्यवस्थित आणि प्रमाणित असावे. मीटर केबिनमध्ये जाण्याची परवानगी केवळ अधिकृत आणि प्रशिक्षित व्यक्तीलाच द्या. वीज जोडण्यांसाठी नेहमी दर्जेदार वायर आणि स्विच वापरा. आपत्कालीन परिस्थितीत संपूर्ण मंडपाचा वीजपुरवठा एकाच स्विचने खंडित करण्याची सोय असावी. तुटलेल्या वायर जोडण्यासाठी केवळ दर्जेदार इन्सुलेशन टेपचाच वापर करा. मीटर आणि स्विच जवळचा रस्ता नेहमी मोकळा ठेवावा, जेणेकरून गरज पडल्यास त्वरित पोहोचता येईल. मंजूर झालेल्या भारापेक्षा मंडपातील विजेचा वापर जास्त होणार नाही याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

आणीबाणीच्या परिस्थितीत त्वरित मदतीसाठी महावितरणने 24 तास उपलब्ध असलेले टोल-फ्री क्रमांक दिले आहेत. 1912, 1800-233-3435. 1800-212-3435 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण स्थानिक अभियंता आणि तंत्रज्ञांचे मोबाईल क्रमांक जवळ ठेवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

तात्पुरत्या वीजजोडणीसाठी मंडळांना त्यांच्या मंजूर वीजभाराप्रमाणे अनामत रक्कम भरावी लागेल. ही रक्कम ऑनलाईन भरल्यास, उत्सव संपल्यानंतर वीजबिलाची रक्कम वजा करून उरलेली रक्कम विनाविलंब परत केली जाईल. यामुळे रक्कम परत मिळवण्यासाठी वाट पाहावी लागणार नाही आणि मंडळाची प्रक्रिया अधिक सुलभ होईल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम