
अनक्लेम्ड ठेवींसाठी २४ ऑक्टोबर रोजी निवारा शिबिराचे आयोजन
अनक्लेम्ड ठेवींसाठी २४ ऑक्टोबर रोजी निवारा शिबिराचे आयोजन
जळगाव प्रतिनिधि
भारत सरकारच्या वित्त मंत्रालयांतर्गत वित्तीय सेवा विभागाच्या “आपले पैसे-आपला अधिकार ” या राष्ट्रव्यापी अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यात अनक्लेम्ड ठेवींबाबत जनजागृती व निवारा विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत सभागृहात होणार आहे.
या शिबिराचे आयोजन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक कार्यालय जळगाव यांच्या वतीने करण्यात आले असून, जिल्ह्यातील सर्व बँका, विमा कंपन्या, तसेच वित्तीय संस्था त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, जनप्रतिनिधी, रिझर्व्ह बँकेचे अधिकारी आणि विविध बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या अभियानाचा उद्देश नागरिकांना त्यांच्या न विसरलेल्या आर्थिक मालमत्तांबाबत-जसे की बँक ठेवी, विमा दावे, शेअर्स, डिव्हिडंड्स, म्युच्युअल फंड रक्कम, पेन्शन फंड इत्यादी माहिती देणे व त्यांचे वैध दावे निकाली काढण्यासाठी मदत करणे हा आहे.
शिबिरादरम्यान UDGAM पोर्टल आणि इतर डिजिटल साधनांच्या माध्यमातून ठेवी शोधणे, नोंदी अद्ययावत करणे आणि दावा प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले जाईल. याशिवाय डिजिटल डेमोन्स्ट्रेशन आणि हेल्प डेस्क सुविधा देखील उपलब्ध असेल. ज्यांचे दावे बँकांनी निकाली काढले आहेत, अशा नागरिकांना प्रमाणपत्रे प्रदान केली जाणार आहेत.
नागरिकांनी आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, छायाचित्र इत्यादी KYC कागदपत्रांसह शिबिरात उपस्थित राहून या जनहितकारी उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अग्रणी बँक कार्यालय, जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रकानव्ये केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम