
अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ उत्साहात संपन्न
अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ उत्साहात संपन्न
यशाचा मंत्र… शालेय गुणांसमवेत जीवनमूल्येही महत्वाची – मिनल करनवाल
जळगाव (प्रतिनिधी) – यशाची संकल्पना जास्तीत जास्त शालेय गुण मिळविणे हिच नाही तर त्यासोबत सकारात्मकता आणि जीवनमूल्ये देखील अत्यंत महत्त्वाची असतात. ती स्पर्धेच्या युगात मोलाची ठरतात. थॉमस एडिसन ने बल्बचा शोध लावला त्या आधी तो हजार वेळा अपयशी झाला होता, मात्र प्रयत्न करीत राहिल्याने तो यशस्वी झाला. विद्यार्थ्यानी प्रयत्न करत रहावे म्हणजे यशाने जीवन उजळून निघेल, असा मोलाचा सल्ला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी उपस्थितांना दिला.
अनुभूती शाळेची संस्कृती, सर्जनशीलतेसह नैतिकता आणि तंत्रज्ञानातुन व्यवसायीक मुल्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांमधून दिसून आली. “आर्टिफिशियल तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी मानवी बुद्धी, संवेदना आणि भावभावनांची जागा ते कधीच घेऊ शकत नाही. तंत्रज्ञानाचा उपयोग मानवाच्या कल्याणासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी व्हावा, असा संदेश यावेळी देण्यात आला.”
भवरलालजी जैन यांच्या स्मृतींना समर्पित ‘फाउंडर्स डे’ च्या सुरवातीला सरस्वती वंदना सादर झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. अनुभूतीच्या ॲम्पी थिएटर मध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सौ. ज्योती जैन, माजी मंत्री सतिश पाटील, गिमी फरहाद, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, डॉ. भावना जैन, प्राचार्य देबासिस दास यांची उपस्थिती होते. मान्यवरांच्या हस्ते मागील वर्षी यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
भारतीय सांस्कृतिक वारसा जपणारी आणि जागतिक दृष्टीवर आधारित अद्वितीय अशी अनुभूती निवासी शाळा आहे. यातील विद्यार्थ्यानी ताणपुरा, तबला, बासरी, गिटार या वाद्यांवर फ्युजन सादर केले. मान्यवरांच्या उपस्थितीत ‘अंकुरानुभूति’ व ‘संदेशानुभूति’ नियतकालिकाचे प्रकाशन झाले. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते.
कृत्रिम बुद्धीमत्तेला चालना देणारे नाट्य, नृत्य, संगीत…
नॅशनल एज्यूकेशन पॉलिसीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या थीमवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले. विशेष उल्लेखनीय ठरलेली नाटके ‘स्लो लाईफ अॅण्ड एआय’, ‘संज्ञानात्मक पूर्वग्रह आणि एआय’, ‘मेडिकेशन अँड एआय’ ‘आर्ट अॅण्ड ए आय’ आणि ‘मानवी नातेसंबंध आणि एआय’ या सर्वांनी तंत्रज्ञान आणि मानवी मूल्यांचा संगम प्रभावीपणे मांडला. व्यावसायिक व शैक्षणिक क्षेत्रात ए आय च्या माध्यमातून होणारे बदल, मानवी संबंधांवर एआय चा प्रभाव यावर भाष्य करणारे नाटिका सादर झाली. अकापेला गीत व रोबोट नृत्याने उपस्थितांचे लक्ष्य वेधून घेतले. आधुनिक तंत्रज्ञानाची विद्यार्थ्यांमध्ये असलेली संशोधनशीलता आणि सामाजिक जाण प्रकर्षाने जाणवली. म्युझिकल योग आणि संगीत यांचे उत्तम सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम