
अपंग गणेश मूर्ती विक्रेत्याला एकता संघटनेकडून आर्थिक मदत; समाजात बंधुत्वाचा संदेश
अपंग गणेश मूर्ती विक्रेत्याला एकता संघटनेकडून आर्थिक मदत; समाजात बंधुत्वाचा संदेश
जळगाव: शहरात गणेशोत्सवाच्या काळात एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. या वर्षी मूर्ती न विकल्या गेल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या एका अपंग गणेश मूर्ती विक्रेत्याला ‘एकता संघटने’ने ५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. या कृतीमुळे समाजात सलोखा आणि बंधुत्वाचा एक सकारात्मक संदेश गेला आहे.
जळगावातील देवेंद्र नगर येथील रहिवासी विकी मिस्त्री (वय २४) हा अपंग तरुण दरवर्षी गणेश मूर्ती तयार करून विकतो. यंदा त्याच्या २५ मूर्ती विकल्या गेल्या नाहीत. त्यातच, महानगरपालिकेच्या एका अनधिकृत कंत्राटदाराने त्याच्याकडून जबरदस्तीने ७०० रुपये वसूल केले. यामुळे विकीचे कुटुंब आर्थिक संकटात सापडले होते.
‘एकता संघटनेचे अध्यक्ष फारूक शेख यांनी तात्काळ दखल घेतली. त्यांनी हुफ्फाझ फाउंडेशनचे सदस्य हाफिज रहीम पटेल, हाफिज शफीक पटेल, हाफिज गुफरान, हाफिज इम्रान आणि आसिफ भाई यांच्यासह विकी मिस्त्रीच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली.
यावेळी फारूक शेख यांनी विकी मिस्त्री, त्याचे वडील दत्तू मिस्त्री, आई लता मिस्त्री आणि भाऊ भावेश यांच्यासमोर ५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. कुटुंबाचे सांत्वन करताना फारूक शेख म्हणाले, “मानवतेची सेवा हाच सर्वात मोठा धर्म आहे, हे इस्लामने शिकवले आहे. प्रत्येक गरजू व्यक्तीला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे.”
या अनोख्या उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात सौहार्द आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका मुस्लिम समुदायातील संघटनेने गणेश मूर्ती विक्रेत्याला मदत केल्यामुळे स्थानिकांनी या उपक्रमाचे खूप कौतुक केले. ही घटना समाजासाठी एक आदर्श असून, धर्माच्या पलीकडे जाऊन मानवतेची सेवा करण्याचा प्रेरणादायी संदेश देते, असे स्थानिकांनी सांगितले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम