
अपत्यप्राप्तीच्या आमिषाने तांत्रिकाकडून महिलेवर बलात्कार; आरोपी फरार
अपत्यप्राप्तीच्या आमिषाने तांत्रिकाकडून महिलेवर बलात्कार; आरोपी फरार
मथुरा (उत्तर प्रदेश): लग्नाला अनेक वर्ष उलटूनही अपत्यप्राप्ती होत नसल्याने निराश झालेल्या एका महिलेला मदत करण्याचे आमिष दाखवून एका तांत्रिकाने तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मथुरेतील नौझील पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी तांत्रिक मुश्ताक अली फरार आहे.
पीडित महिलेच्या लग्नाला आठ वर्षे झाली होती, मात्र तिला अपत्यप्राप्ती होत नव्हती. यामुळे ती मानसिकरित्या त्रस्त होती. या निराशेच्या काळात ती मुश्ताक नावाच्या एका तांत्रिकाकडे गेली. त्याने तिला मंत्रतंत्राच्या मदतीने गर्भधारणा करून देतो, असे आश्वासन दिले.
तांत्रिकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ती त्याच्याकडे गेली. संधी साधून आरोपी मुश्ताकने तिच्यावर बलात्कार केला. या धक्कादायक घटनेनंतर पीडित महिला कशीबशी घरी पोहोचली आणि तिने आपल्या कुटुंबाला घडलेला प्रकार सांगितला.
कुटुंबीयांनी तात्काळ नौझील पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तांत्रिक मुश्ताक अली याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अधीक्षक सुरेशचंद्र रावर यांनी सांगितले की, घटनेनंतर आरोपी मुश्ताक अली फरार झाला आहे. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांची अनेक पथके तयार करण्यात आली असून, त्याच्या शोधात विविध ठिकाणी छापे टाकले जात आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अशा प्रकारचे तांत्रिक चमत्कारांचे आमिष दाखवून भोळ्याभाबड्या लोकांना आपल्या वासनेचा बळी बनवत असल्याची चर्चा सुरू आहे

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम